हिंदी भाषेची सक्ती : साहित्यीक आता शासनाला पुरस्कार परत करणार
Hindi language compulsion: Now the government will return the literary award मुंबई (23 जून 2025) : हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात राज्यभरातील साहित्यीक एकवटले असून त्यांनी आता शासनाकडून मिळालेले पुरस्कार परत करण्याची तयारी चालवली आहे.
राज्यातील नव्या शैक्षणिक धोरणात पहिलीपासूनच्या वर्गातील मुलांना तिसरी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातच हिंदी भाषेशिवाय जर एखाद्याला अन्य भाषा शिकायची असेल तर 20 विद्यार्थ्यांनी तशी मागणी करणे गरजेचे आहे, अशी अट शासनाने घातली आहे. त्यातूनच अप्रत्यक्षपणे पहिलीपासून मुलांना हिंदी सक्तीने शिकावी लागणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या भूमिकेचा सर्वच मराठी भाषा प्रेमींकडून विरोध होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. आता मराठी साहित्यिकही आपला आवाज बुलंद करत आहेत.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून लेखक, कवी हेमंत दिवटे यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा त्यांच्या सोशल मीडियावर केली आहे. हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून मला पॅरानोया ह्या कवितासंग्रहासाठी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार रकमेसकट परत करीत आहे. सरकारने निर्णय मागे घेतला तरच मी माझा निर्णय मागे घेईन असं त्यांनी जाहीर केले आहे. दिवटे यांच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले आहे. राज्य सरकारकडून हिंदी सक्ती केल्याने पालकांमध्येही नाराजी पसरली आहे.




