कठोरा जॅकवेलपासून जाणारी मुख्य पाईप लाईन सरळ रेषेत हवी : राजेंद्र चौधरी

वरणगाव (23 जून 2025) : कठोरा जॅकवेलपासून टाकली जाणारी 25 कोटी रुपयांच्या योजनेची पाईप-लाईन ही रावजी बुवा उड्डाणपूलापर्यंत सरळ रेषेत टाकण्यात आली असून पुलाखालून ही पाईप लाईन न टाकता ती संपूर्ण गावाचे घाण पाणी वाहून नेणार्या नाल्यातून नागमोडी (वेड्या-वाकड्या) पद्धतीने वळण देऊन टाकल्या जात आहे. अस्वच्छ पाण्याच्या नाल्यातून पाईप-लाईन गेल्यास भविष्यात जर पाईप-लाईन लिकेज झाल्यास वरणगावकरांना अस्वच्छ पाणी मिळेल व विविध जलजन्य आजारांना सामोरे जावे लागेल. यापूर्वीचर 13 कोटी रुपये योजनेची पाईप लाईन जर या पुलाखालून जाऊ शकते तर नव्याने टाकण्यात येणारी पाईप लाईन टाकण्यात काय अडचण आहे? असा प्रश्न जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी केला आहे.
लोकप्रतिनिधींनी घ्यावी दखल
सदरचा रस्ता केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे संबंधित विभाग पाईप लाईन टाकू देत नसल्यास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे हा विषय मांडून परवानगी मिळवून घ्यावी तसेच राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडेदेखील पाठपुरावा करून सदरची बाब त्यांच्या लक्षात आणून खास बाब म्हणून केंद्र सरकारकडून सदरची पाईप लाईन सरळ रेषेत पुला खालून टाकून मंजूर करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.