माळेगाव सहकार साखर कारखाना निवडणूक : अजित पवार विजयी

Malegaon Cooperative Sugar Factory Election : Ajit Pawar wins पुणे (24 जून 2025) : अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली आहे. ‘ब’वर्ग गटातून 101 मतांपैकी 91 मते घेत अजित पवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीतील हा पहिलाच निकाल समोर आला आहे.
‘आरोप’ प्रत्यारोपांच्या झडल्या फैरी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले होते. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनल’ आणि भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या ‘सहकार बचाव पॅनल’मध्ये थेट लढत आहे. या दोन्ही पॅनलने एकमेकांवर चिखलफेक करत ही रंगत आणखीनच वाढवली होती. त्यात ‘सहकार सहकार बचाव पॅनल’ने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (पीडीसीसी) रात्री 11 वाजेपर्यंत बँक सुरू ठेवल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पीडीसीसी बँक बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत होती सुरू
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू असताना पीडीसीसी बँक बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. त्यावेळी बँकेत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदार याद्या आढळल्या. यावेळी अजित पवारांचे पीए सुनील मुसळे, व मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारीही तिथे आढळून आले. हे दोन्ही बँकेत का उपस्थित होते? व ही बँक रात्री उशिरापर्यंत का सुरू होती? असा सवाल चंद्रराव तावरे यांनी उपस्थित केला होता. त्यांनी या बँकेच्या माध्यमातून मतदारांना पैशाचे वाटप होत असल्याचाही आरोप केला होता.