यावल शहरात तक्रार निवारण सभेचा गचाळ नियोजनामुळे उडाला बोजवारा

गटविकास अधिकार्‍यांच्या कामावर दोन्ही आमदारांसह सीईओंची नाराजी : सभेतच सुनावले खडे बोल


यावल (24 जून 2025) : यावल पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रावेरचे आमदार अमोल जावळे व चोपडा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रचंड गोंधळ उडाला.

अधिकार्‍यांना सुनावले खडे बोल
गचाळ नियोजनामुळे जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवालसह दोन्ही आमदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. तक्रारदारांना तक्रारदेखील व्यवस्थित मांडता आली नाही व गटविकास अधिकारी यांच्याबद्दल प्रचंड तक्रारीमुळे लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी सभेतच त्यांना खडे बोल सुनावले. शेतकर्‍यांचे गोठे आणि घरकुल धारकांचे रखडलेले अनुदान तसेच गटविकास अधिकारी नागरिकांना भेटत नसल्याच्या तक्रारींनी सभा गाजली









कार्यक्रमाचा उडाला बोजवारा
यावल पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली. सभेकरीता तालुकाभरातून मोठ्या संख्येत नागरिक आपल्या तक्रारी घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले मात्र, पंचायत समितीच्या छोट्याशा सभागृहातच हा कार्यक्रम गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी आयोजित केल्यामुळे त्याचा पुरता बोजवारा उडाला. अधिकार्‍यांनीचं सभागृह भरले तर तक्रारदार थांबणार कुठे ? अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आल्या आल्या आमदार अमोल जावळे व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणेंसह जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे नागरिकांनी घरकुलचे रेंगाळलेले अनुदान व गोठ्यांच्या प्रकरणातील अनेक केल्या तसेच गटविकास अधिकारी या कार्यालयात भेटत नाही, अशा तक्रारी मांडल्या.

अन सभागृहात केवळ अधिकारीच थांबले
प्रचंड गोंधळात ही सभा सुरू झाली आणि तक्रार दाराच्या प्रचंड तक्रारी या ठिकाणी येत होत्या. या दरम्यानच उडालेल्या गोंधळात चोपडा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी नागरिकांना विनंती करून त्यांच्या तक्रारी संदर्भात प्रशासनाचा आम्हीच आढावा घेतो, असे सांगितल्यानंतर सभागृहात फक्त जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी हेच थांबले त्यानंतर घरकुलच्या रेंगाळलेल्या अनुदान संदर्भात आढावा घेतला असता तब्बल तीन हजार घरकुल लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता त्यांच्या खात्यात गेला नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रलंबित अनुदान का राहिले याबाबत अधिकारी व आमदार यांनी गटविकास अधिकारी यांना खडे बोल सुनावले.

यांची होती उपस्थिती
या सभेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, संचालक सूर्यभान पाटील, हर्षल पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक गणेश नेहेते, भाजपा तालुकाध्यक्ष सागर कोळी, अनिल पाटील, विलास चौधरी, उजैनसिंग राजपूत, शेतकी संघाचे तेजस पाटील, भरत चौधरी, मुन्ना पाटील, प्रभाकर सोनवणे, डॉ.नरेंद्र कोल्हे, वढोदा सरपंच संदीप सोनवणेसह मोठ्या संख्येत राजकीय पदाधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहायक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !