40 हजारांची लाच : उपप्राचार्य लाचलुचपतच्या जाळ्यात


Bribe of 40 thousand : Vice-principal caught in the net of bribery पुणे (24 जून 2025) : 40 हजारांची लाच घेताना माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्रचार्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

एका खाजगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमधील वार्षिक परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्यासाठी आणि परीक्षा विना अडथळा सुरळीत पार पडण्यासाठी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षांकडून अवधूत भिमाजी जाधवर (53) यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली.









जाधवर हे माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य आहेत, त्यांच्याकडे सध्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदार हे एका खासगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत.

तक्रारदारांच्या इन्स्टिट्यूटतर्फे चालू वर्षाच्या परीक्षेसाठी 45 विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेसाठी शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेकडून परीक्षा पर्यवेक्षक नेमले जातात. त्यानुसार तक्रारदारांनी पर्यवेक्षक नेमणुकीसाठी अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस पत्र दिले होते. जाधवर यांनी तक्रारदाराकडे परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्यासाठी आणि ती परीक्षा सुरळीत पार पाडून देण्यासाठी परीक्षेस बसलेल्या एका विद्यार्थ्यासाठी दोन हजार असे 45 विद्यार्थ्यांसाठी एकूण 90 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर 10 हजार रुपये घेऊन पर्यवेक्षक नेमण्याचे पत्र दिले. त्यानंतर पर्यवेक्षक येऊन परीक्षा सुरू झाली. परीक्षा सुरू असताना जाधवर यांनी उर्वरित 80 हजार रुपये देण्यासाठी तक्रारदाराच्या पाठीमागे तगादा लावला. तडजोडीअंती 40 हजार रुपये ठरले.

त्यानंतर तक्रारदारांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच लुचपत विभागाने मंगळवारी बारामती येथील हॉटेल सिटी इन येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून 40 हजारांची लाच घेताना लाच लुटपत विभागाने अवधूत जाधवर यांना रंगेहाथ पकडले. जाधवर यांच्यावर बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !