संतापजनक ! महिला फौजदाराचा भाजपा पदाधिकार्याकडून विनयभंग

पुणे (25 जून 2025) : महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपान पदाधिकार्याने महिला पोलिस उपनिरीक्षकाचा विनयभंग केल्याची घडली आहे. प्रमोद कोंढरे असे आरोपी भाजप नेत्याचे नाव असून त्यास अटक करण्यात आली. आरोपी हा भाजपचा पुण्यातील शहर महामंत्री आहे.
काय घडले नेमके
त्याच्यावर एका महिला पोलिस उपनिरिक्षकाने विनयभंग केल्याचा ठपका ठेवला आहे. परिणामी त्याच्यावर येथील पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, भाजप नेते नितीन गडकरी सोमवारी पुण्याच्या दौर्यावर होते. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमासाठी भाजपचे स्थानिक नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. कार्यक्रम संपल्यानंतर भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बंदोबस्तावर तैनात असणार्या पोलिस कर्मचार्यांना एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी नेले.
त्यावेळी भाजपचे शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेत महिला पोलिस उपनिरीक्षकाला दोनवेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला. महिला पीएसआयने तत्काळ ही गोष्ट आपल्या वरिष्ठ अधिकार्यांना सांगितली. त्यानंतर चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात कोंढरे महिला पोलिसाला पाठीमागून धक्का देत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशांनुसार या प्रकरणी प्रमोद कोंढरे याच्याविरोधात परासखाना पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रमोद कोंढरेला अटक करण्यात आली. हे प्रकरण पूर्ण पारदर्शकपणे व कायद्यानुसार हाताळण्यात येईल, अशी ग्वाही एका उच्चपदस्थ पोलिस अधिकार्याने या प्रकरणी दिली आहे. दुसरीकडे, प्रमोद कोंढरे यांनी एका निवेदनाद्वारे आपल्यावरील आरोप फेटाळलेत. संबंधित महिला पोलिस अधिकार्याला मी हेतुपुरस्सर धक्का दिला नाही. माझा चुकून धक्का लागला असेल. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असे त्यांनी म्हटले आहे.
