मुलीने घरातून पळून जावून विवाह करताच आईने उचलले टोकाचे पाऊल

Mother takes extreme step after daughter runs away from home and gets married सातारा (25 जून 2025) : हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या मुलीने घरातून पळून जावून गावातील तरुणासोबत विवाह केल्यानंतर आईने नैराश्यातून जीवन संपवले. सातारा तालुक्यातील एकाच गावात ही घटना घडली.
गावातील तरुण, तरुणीचे एकमेकांवर अनेक वर्षांपासून प्रेम होते मात्र, घरातील लोकांचा लग्नाला विरोध होईल या भीतीने दोघांनी रविवार, 22 रोजी घरातून पलायन केले. त्यानंतर, एका ठिकाणी जाऊन त्यांनी रजिस्टर लग्न केले. या प्रकारानंतर मुलीच्या आई-वडिलांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात येऊन मुलगी पळून गेल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनीही तातडीने दोघांचाही शोध घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी त्यांनी रजिस्टर लग्न केले असल्याचे समोर आले. पोलिसांनी मुलगा आणि मुलीच्या कुटुंबातील लोकांना पोलिस ठाण्यात बोलावले. दोघेही सज्ञान असल्याने त्यांच्या इच्छेने त्यांनी लग्न केले आहे. त्यामुळे दोघांना सुखात संसार करू द्या, आडकाठी करू नका, असा सल्ला पोलिसांनी दोन्ही कुटुंब प्रमुखांना दिला.
मुलगी घरातून पळून गेल्याने तिच्या आईने मनाला फार लावून घेतले. दोन दिवसांतच मुलगी परत पोलिस ठाण्यात आली मात्र येताना दोघे लग्न करून आले हे जेव्हा मुलीच्या आईला समजले, तेव्हा तिला जबर मानसिक धक्का बसला. मुलीला पाहण्यासाठीही आई पोलिस ठाण्यात आली नाही. घरातले लोक पोलिस ठाण्यातून घरी जाईपर्यंत मुलीच्या आईने नैराश्यातून विषारी औषध प्राशन केले.
