95 हजारांची लाच घेताना पोलिस निरीक्षकासह महिला कर्मचारी जाळ्यात
रक्षकच बनले भक्षक : कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ

Police inspector and female employee caught taking bribe of Rs 95,000 धाराशिव (26 जून 2025) : एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी तडजोडीअंती महिला कर्मचार्याकरवी 95 हजारांची लाच घेताना धाराशीव पोलिस निरीक्षकाला एसीबीने अटक केली आहे. एसीबीच्या जाळ्यात बडा मासा अडकल्याने लाचखोर पुरते हादरले आहेत. धाराशीव पोलिस निरीक्षक मारुती शेळके व महिला अंमलदार लोखंडे असे अटकेतील आरोपींची नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
धाराशीव ग्रामीण पोलिसात दाखल 306 अंतर्गत गुन्ह्यातील 48 वर्षीय महिलेचा मुलगा आरोपी असून त्याला गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस निरीक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली. दोन लाखांची मागणीनंतर 95 हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले मात्र तक्रारदाराने एसीकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराने पोलिस निरीक्षक शेळके यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी चलाखीने महिला कर्मचारी मुक्ता लोखंडे यांच्याशी बोलण्यास सांगितले. लोखंडे यांनी तक्रारदार महिलेशी बोलणी करून सौदा पक्का केला. लाचेची रक्कम एक लाखावरून 95 हजार रुपयांवर आणण्यात आली आणि ती बुधवारी धाराशिवच्या शासकीय विश्रामगृहात स्वीकारण्याचे ठरले.
एसीबीच्या पथकाने शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात अत्यंत गुप्तपणे सापळा लावला. ठरल्याप्रमाणे मुक्ता लोखंडे यांनी तक्रारदार महिलेकडून 95 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना महिला पंचासमक्ष रंगेहाथ पकडले.
पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवत त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या विविध कलमांनुसार आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत दोघांच्या अंगझडतीत एकूण तीन मोबाईल फोन, एक मोटारसायकल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली.
