हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र

Thackeray brothers unite against Hindi compulsion मुंबई (27 जून 2025) : राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा झडत असतानाच आता हिंदी सक्ती विरोधात दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मनाने एकत्र आलेलेच आहेत. मराठी भाषा, मराठी अस्मिता यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकत्र आला होता. तशीच भूमिका दोन्ही ठाकरे बंधूंची असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दोन मोर्चे हे योग्य वाटत नाही, असे सांगण्यासाठी राज ठाकरे यांचा मला फोन आला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनीदेखील मान्य केले त्यामुळे मोर्चा एकत्र काढण्याचा निर्णय झाला असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले.

दोन्ही बंधू एकत्र : संजय राऊत
यासंबधी माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, हिंदी सक्ती विरोधात दोन्ही ठाकरे बंधू मराठी भाषेसाठी एकत्र आले आहेत. दोन मोर्चे निघणे हे योग्य वाटत नाही, हे सांगण्यासाठी मला राज ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांची ही भूमिका मी उद्धव ठाकरे यांना कळवली. त्याला उद्धव ठाकरे यांनीही लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, 6 जुलै ही सोईची नाही. त्या दिवशी आषाढी एकादशी आहे त्यामुळे एकतर राज ठाकरे यांनी 7त तारखेच्या आंदोलनात सहभागी व्हावे, किंवा 5 तारखेला आंदोलन करावे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. त्यानंतर मी राज ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांनी देखील ते तत्काळ मान्य केले. आणि 5 जुलै रोजी तारखेला एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय झाला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ही तर महाराष्ट्राची भूमिका
राज्याच्या मनात जे आहे, ते मी करेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. सुप्रिया सुळे यांनी देखील या विरोधात भूमिका मांडली होती. त्यामुळे हा सर्व निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्हाला लढावे लागेल आणि त्याचे नेतृत्व ठाकरेंनी करावे, असे देखील राऊत म्हणाले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच पाहिजे, ही महाराष्ट्राची भूमिका आहे. महाराष्ट्रातील मनात तेच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
