भुसावळात आर्द्रा नक्षत्रात पाऊस धो-धो बरसला

Rain poured down heavily in Bhusawal during the Ardra Nakshatra. भुसावळ (27 जून 2025) : आषाढाच्या पहिल्याच दिवशी आर्द्रा नक्षत्रात भुसावळ शहरासह तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. दिवसभरात शहरात 39.6 मिली पाऊस झाल्याची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाने केली आहे.
हैराण भुसावळकरांना दिलासा
पहिल्या दमदार पावसाने उकाड्यामुळे हैराण झालेले भुसावळकर सुखावले आहेत. दरम्यान, तालुक्यात सरासरी 65 ते 70 टक्के पेरण्या झाल्या आहेत. या पावसामुळे जून अखेरपर्यंत संपूर्ण वहिताखालील क्षेत्रावर पेरण्या होतील, असा अंदाज आहे. पावसामुळे तापमानात 30 अंशांपर्यंत घसरण होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान 30 जूनपर्यंत विभागात किमान 70 ते 120 मिमी दमदार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी वर्तवला आहे.

पहिल्याच पावसात दाणादाण
शहरातील खडकारोडवर रस्त्याचे काम सुरु आहे. पावसानंतर या मार्गावर पाणी साचले. महामार्गावर अयोध्या नगरातून अंडरपासमध्ये पावसाचे पाणी तुंबले आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरील दगडी बोगद्यातही पाणी तुंबले होते. नाहाटा चौफुली, खडका चौफुली, शिवपूर कन्हाळे चौफुली आदी अंडरपासवर पावसाच्या पाण्यामुळे तळे साचले होते.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून अधिक सक्रिय 30 जूनपर्यंत जिल्ह्यात मान्सूनचा जोर वाढेल. या कालावधीत 120 मिमीपर्यंत पाऊस होऊ शकेल. ढगाळ वातावरण कायम राहिल. यामुळे आर्द्रता 70 ते 85 टक्के असेल. कमाल तापमानातही घसरण होईल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून अधिक सक्रिय झाल्याने पावसाचा जोर वाढेल.
