एरंडोल शहरातील दशरथ महाजन यांना अपघातातून ठार मारण्याचा प्रयत्न : ‘बदक सुतार’सह त्रिकूटाला गुन्हे शाखेकडून बेड्या
भालगाव रस्त्यावर अपघाताचा बनाव उघड : कुटूंबियांचा आरोप ठरला खरा

Attempt to kill Dashrath Mahajan in Erandol city by accident: Trio including ‘Badak Sutar’ arrested by Crime Branch जळगाव (27 जून 2025) : एरंडोल शहराचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन हे अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झाले होते मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा अरोप कुटूंबियांनी करीत सखोल चौकशीची मागणी केली होती. जळगाव गुन्हे शाखेने समांतर तपासादरम्यान महाजन यांचा अपघात घडला नसून त्यांना ठार मारण्यासाठी केलेला पूर्व नियोजित हल्ला असल्याचे सिद्ध केले आहे. याबाबतची माहिती जळगाव अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, उमेश उर्फ बदक सुरेश सुतार (40), शुभम कैलास महाजन (19) व पवन कैलास महाजन (20, सर्व रा.एरंडोल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे वा कुणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा करण्यात आला? याबाबतही पोलिसांकडून सखोल तपास केला जात असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
महाजन कुटूंबियांचा आरोप ठरला खरा
माजी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन यांच्या फिर्यादीनुसार, दशरथ महाजन हे एरंडोल नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष असल्याने त्यांचे अनेक राजकीय व्यक्तींशी मतभेद होते. यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी दशरथ महाजन यांचा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवली होती. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार केल्यानंतर पथकाने घटनास्थळाकडे ये-जा करणार्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात अडचणी आल्या परंतु,तपास पथकातील पोलीस हवालदार प्रवीण मांडोळे आणि राहुल कोळी यांनी एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजचे सलग आठ तास परीक्षण करून आरोपींना निष्पन्न केले. चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली तर आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार याने पूर्ववैमनस्यातून हा गुन्हा केल्याचे सांगितले. गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी गाडी संशयित आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतारकडून जप्त करण्यात आली.

यांनी केली गुन्ह्याची उकल
हा गुन्हा जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील, एरंडोल पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार हरीलाल पाटील, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, रवी कापडणे, राहुल कोळी, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, तसेच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलिस शिपाई प्रशांत पाटील आदींच्या पथकाने उघडकीस आणला.
