रिंगणगावातील बालकाची निर्घृण हत्या : पोलिसांकडून एसआयटी पथक स्थापन
Brutal murder of a child in Ringangaon : Police form SIT team एरंडोल (28 जून 2025) : रिंगणगावातील अल्पवयीन बालकाची हत्या झाल्यानंतर समाजमन संतप्त झाले होते. हा खून नरबळीच्या उद्देशाने झाल्याचा दावा करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पोलिस प्रशासनाने याची दखल घेत तपासार्थ एसआयटी पथकाची स्थापना केल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
तीन संशयीतांना अटक : नरबळीच्या कलमाचाही समावेश
पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, रिंगणगावचे गजानन नामदेव महाजन ( 45) यांचा मुलगा 16 जून रोजी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह काही दिवसांत सापडला. अल्पवयीनाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली शिवाय तपासात नरबळीच्या कलमांचा समावेशही करण्यात आला. यानंतरही ग्रामस्थांनी तपासाबाबत असंतोष व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.





मोर्चेकर्यांनी केल्या या मागण्या
गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, नरबळीचा कलम तपासात समाविष्ट करून कार्यवाही करावी, शेतातील सीसीटीव्हीमध्ये दिसणार्या एरंडोल संशयित आरोपी करावे, उज्ज्वल निकम यांची सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक करावी, या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आदी मागण्या मोर्चेकर्यांनी केल्या तर यातील तीन मागण्या आधीच मान्य झाल्या असून उर्वरित दोन मागण्यांसाठी पोलिस प्रशासन शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
गुन्ह्याच्या तपासार्थ एसआयटी पथकाची स्थापना
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. यात काही अधिकारी समाविष्ट आहेत. यामध्ये चाळीसगाव विभागाच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर (पर्यवेक्षण अधिकारी), अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, एरंडोल पोलिस निलेश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, सचिन पाटील, राहुल कोळी या विशेष पथकाकडून तपास अधिक गतीने आणि प्रभावीपणे करण्यात येणार आहे. डॉ.रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा लावला जाणार आहे.
