जळगावात घातक केमिकलने घेतला तरुणाचा बळी

A young man died from a hazardous chemical in Jalgaon जळगाव (3 जुलै 2025) : कंपनीत घातक व विषारी द्राव्याच्या संपर्कात आल्याने विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विश्वनाथ शांताराम सोनवणे (27, रा.कुसुंबा, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
काय घडले तरुणासोबत
विश्वनाथ सोनवणे हा आपल्या कुटुंबासह कुसुंबा गावात राहत होता. शुक्रवार, 27 जून रोजी तो एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत असताना काहीतरी विषारी द्रावणाच्या (केमिकल) संपर्कात आला. यामुळे त्याला तीव्र विषबाधा झाली. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने रात्री 10 वाजता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विश्वनाथवर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यानच मंगळवार, 1 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.