भीषण अपघातात अकलदूच्या तरुणाचा मृत्यू

Akaldu youth dies in a horrific accident यावल (4 जुलै 2025) : दुचाकीच्या भीषण अपघातात अकलूद, ता.यावल गावातील 17 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. निंबादेवी धरण पाहून आपल्या गावाकडे परतत असताना हा अपघात घडला आहे.
काय घडले नेमके
अकलूद गावातील विजय शिवा भील (17), कृष्णा गजानन पवार (दोन्ही रा.अकलूद) आणि मयूर सुधाकर सोनवणे (21, रा.वाघळूद, ता.यावल) हे तिघे मित्र एकाच शाईन दुचाकीने निंबादेवी धरण पाहण्यासाठी गेले होते. धरण पाहून ते यावल तालुक्यातील अकलूद येथे परतत असताना, सावखेडासीम गायरान रस्त्यावरील एका वळणावर त्यांच्या मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले. या भीषण अपघाताची तीव्रता इतकी होती की, मोटारसायकलचे दोन तुकडे झाले. यामध्ये विजय शिवा भिल याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने यावलच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मयूर सुधाकर सोनवणे आणि कृष्णा गजानन पवार यांना वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले आहे.