भुसावळ तहसीलदारांची पुन्हा मोठी कारवाई : जोगलखेडा शिवारातील वाळू साठे महसूल विभागातर्फे जप्त


Sand deposits in Jogalkheda Shivar seized by the Revenue Department भुसावळ (5 जुलै 2025) : जोगलखेडा शिवार परिसरात तहसीलदार नीता लबडे यांनी अवैध गौण खनिजाविरूध्द पाहणी केल्यानंतर त्यांना जंगलात वाळूचे सुमारे पाच साठे मिळून आले. तहसीलदार लबडे यांनी हे साठे पंचनामा करीत जप्त केल्याने वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

वाळू साठ्यांवर कारवाईने खळबळ
तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघुर नदी पात्र जोगलखेडा शिवार परिसरात अवैधरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक तपासणी कामी पथक गस्तीवर गेले असता जंगल सदृश्य परिस्थितीत पाच ठिकाणी सुमारे 45 ब्रास वाळूचे ढीग आढळून आले. महसूल पथकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन सदर वाळू साठ्याची पाहणी करून वाळू साठ्याचे पंचनामे करून ते जप्त केले. वाळू साठे सुरक्षित स्थळी भानखेडा येथील जिल्हा परिषद शाळा परिसर येथे हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यामुळे वाळूचा साठा काही वाहन व जेसीबीद्वारे हलविण्यात आला असून भानखेडा पोलिस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आला.









वाळू शासन परिपत्रकानुसार घरकुलास मोफत वाळू उपलब्ध करून देणे, या अनुषंगाने ही वाळू उपलब्धतेप्रमाणे जोगलखेडा भानखेडा गावातील घरकुलाच्या लाभार्थी यांना प्रति लाभार्थी नियमानुसार दोन ब्रास प्रमाणे वाटप करण्याच्या सूचना केल्या.

तहसीलदार नीता लबडे यांनी नदीपात्राच्या परिसराची पाहणी वेळी शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प यांच्याकडून कडगाव-जोगलखेडा या गावास जोडणारा पुलाचे बांधकाम ठिकाणी गेले असता तेथेही सुमारे 60 ब्रास वाळूचा साठा मिळाला. या साठ्याबाबत शहानिशा करून त्याची विल्हेवाट लावण्यात येईल तसेच रस्ता तयार करण्याकामी वापरलेला मुरूम व माती याबाबत सुध्दा पंचनामे करून सदरचा साठा जप्त केला आहे, तो सुध्दा घरकुल लाभार्थी यांना वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई मंडळाधिकारी प्रवीण पाटील, साकेगाव तलाठी मिलिंद तायडे, तलाठी नितीन केले, रोशन कापसे, शीतल अवस्थी, निशा गायकवाड, कोतवाल जितेश चौधरी, पोलिस पाटील भूषण पाटील व शरद पाटील हे होते. परिसरात होणार्‍या अवैध गौणखनीज उत्खनन व वाहतुकीवर अंकुश बसवण्याकरिता पोलिस विभागाला सुद्धा पत्र दिल्याचे तहसीलदार नीता लबडे यांनी सांगितले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !