ठाकरे बंधू एकत्र : मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक कसा : उद्धव ठाकरेंची कणखर टीका

Thackeray brothers together : How can someone who says Jai Gujarat in front of their boss be a follower of Balasaheb’s thoughts ? : Uddhav Thackeray’s strong criticism मुंबई (5 जुलै 2025) : मुंबईतील वरळीतील डोम येथे झालेल्या विजयी मेळाव्यात तब्बल 18 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. पहिलीच्या इयत्तेपासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर प्रथमच विजयी मेळाव्याच्या निमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आले.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता कणखर टीका केली. मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक कसा ? असा प्रश्न विचारत ठाकरेंची तोफ धडाडली.
हे तर गद्दार
उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर टीकेचे बाण चालवताना म्हटले की, तो एक गद्दार काल बोलला जय गुजरात, किती लाचारी करायची? तो पुष्पा पिक्चर तुम्ही पाहिला आहे. दाढीवरती हात फिरवून म्हणायचं झुकेगा नहीं साला, तसं हे गद्दार म्हणतात उठेगा नहीं साला. कुछ भी बोलो उठेगाही नहीं अरे कसे उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं.. म्हणजेच विचार वगैरे असं मी म्हणतोय.
‘जय गुजरात’ अशी घोषणा देणारा बाळासाहेब ठाकरे यांचा पाईक असू शकत नाही असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मगा आता उघडा डोळे बघा नीट कारण आता डोळे उघडले नाहीत तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, ते कायमचे मिटून जातील. आता आलेली जाग जर जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, असेही ठाकरे म्हणाले.
आम्हाला एकत्र आणण्याचे श्रेय फडणवीसांना
राज ठाकरे भाजपाला उद्देशून म्हणाले की, ‘तुमच्या हातात सत्ता असेल, पण ती सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता रस्त्यावर आहे. मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण फक्त मोर्चाच्या चर्चांनीच माघार घ्यावी लागली. मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं की कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. जे बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असे राज ठाकरे म्हणाले.
मराठी हाच आमचा झेंडा
आजच्या मेळाव्यालाही कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा आहे. माझ्या मराठीकडे आणि महाराष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायचं नाही. खरं तर हा प्रश्नच अनाठायी होता मात्र हिंदी सक्तीचा विषय कोठून आला? ते मला कळलं नाही. हिंदी सक्ती ही कोणासाठी? लहान मुलांसांठी हिंदी सक्ती का? कोणाला विचारायचं नाही, काही नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, फक्त आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, मग आम्ही लादणार, तुमच्या हातात सत्ता असेल, पण ती सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता रस्त्यावर आहे , असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपाला दिला.
