पुण्यात संगणक अभियंता तरुणीवर अत्याचार

Computer engineer girl assaulted in Pune पुणे (5 जुलै 2025) : राज्यात महिलांसह मुलींवर सातत्याने अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. व्यवसायाने आयटी कंपनीत संगणक अभियंता असलेल्या तरुणीवर कुरीयर कर्मचारी आल्याचे भासवून एकाने अत्याचार केला. पोलिसांनी दोन संशयितांची चौकशी सुरू केली असून आरोपी तरुणीला आधीपासून ओळखत असल्याची माहिती आहे.
काय घडले पुण्यात
कल्याणीनगर येथील एका आयटी कंपनीत पीडिता संगणक अभियंता आहे. ती आणि तिचा भाऊ दोन वर्षांपासून पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहते. भाऊ काही निमित्ताने गावी गेला होता. त्यानंतर ही घटना घडली.

आरोपीने कुरिअर कंपनीचा कर्मचारी असून बँकेचे कागदपत्रे असल्याचे तरुणीला सांगितले. तिने सेफ्टी दरवाजा उघडला. सही करण्यासाठी तरुणी मागे फिरली, तेव्हा तो घरात घुसला आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याने तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारला. तरुणी बेशुद्द झाली. आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर मोबाईलमध्ये सेल्फी घेतली. याबद्दल कुणाला सांगितले तर जीवे मारेन अशी धमकी देत मी पुन्हा येईन असा मेसेज त्याने टाईप करून ठेवला होता.
पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटना परिसराची पाहणी केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पथके नेमण्यात आले आहे. फॉरेन्सिक पथकाने तरुणीच्या नाक आणि तोंडाचे नमुने घेतले आहेत. तोंडावर मारलेला स्प्रे कोणता होता, याचीही तपासणी केली जाणार आहे.
पोलिसांनी सोसायटीतील सीसीसीटीव्हीची पाहणी केली. त्याचबरोबर गेटवरील आलेल्या-गेलेल्यांची यादीही बघण्यात आली. प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, आरोपी तरुणीला आधीपासून ओळखत होता.