जळगावात बालरंगभूमी परिषदेच्या ‘दिंडी’ सोहळ्याने वेधले लक्ष


जळगाव (6 जुलै 2025) : शहरातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणार्‍या बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे आषाढी एकादशीनिमित्ताने कै.गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यामंदिराच्या सहकार्याने ‘वारी पंढरीची, दिंडी बालवारकर्‍यांची’ या दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात 400 विद्यार्थी – विद्यार्थिंनींनींसह त्यांचे शिक्षक व पालकांनी सहभाग घेतला होता.

सोहळ्याच्या सुरुवातीला केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कै.परशुराम विठोबा प्राथ. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले. विठ्ठल रखुमाई तसेच विविध संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी – विद्यार्थिंनी सहभागी झाले होते. त्यांच्यासह पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकांचे नृत्य लेझीम, टाळ नृत्य परिसरातील नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. या सोहळ्यातील नृत्य दिग्दर्शन शिक्षक योगेश भालेराव यांचे होते.

बालरंगभूमी परिषदेचे गायक दिपक महाजन, सचिन महाजन व त्यांना संबळवर साथ करणारे अवधूत दलाल यांनी पालखी सोहळ्याची रंगत वाढवली. सुमारे तीन किलोमीटरची वाटचाल करत प्रभात कॉलनीतील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दिंडी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.यावेळी वारकरी संप्रदायातील संतांची माहिती बालकांना व्हावी म्हणून संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.

पालखी सोहळ्याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, दिपक महाजन, पंकज बारी, सुदर्शन पाटील, हर्षल पवार, मोहित पाटील, डॉ.श्रध्दा पाटील यांच्यासह मुख्याध्यापिका धनश्री फालक , उपशिक्षक कल्पना तायडे, सूर्यकांत पाटील, योगेश भालेराव, भावना धांडे, सीमा गोडसे, स्वाती पाटील, योगेश पाटील, दीपक पाटील, चारुलता भारंबे, मीनाक्षी इसे, गायत्री पवार, उज्वला वाशिमकर आदी उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पालखी व दिंडी सोहळा यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व कै.गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यामंदिराचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

विठू माऊलीच्या गजरात पदाधिकारी दंग
पालखी दिंडी सोहळ्यादरम्यान मृदंग टाळ यांचा नाद सोबत संबळची साथ, बालकांचे नृत्य, लेझीम, विठूनामाचा गजर यामुळे तयार झालेल्या भक्तीमय वातावरणात लहानांसोबत मोठ्यांनाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. बालकांसोबत त्यांचे पालक, शिक्षक व बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे पदाधिकारीही विठू माऊलीच्या गजरात दंग झाले होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !