जळगावात कैद्याकडून कारागृह कर्मचार्‍याला मारहाण


Prisoner beats up prison staff in Jalgaon जळगाव (6 जुलै 2025) :  जळगाव उपजिल्हा कारागृहातून बाहेर काढलेल्या एका कैद्याने परत बॅरेकमध्ये जाण्यास नकार देत कारागृह कर्मचार्‍याला मारहाण केली. हर्षद रब्बी पटेल (21, रा. सुप्रिम कॉलनी) असे संशयीत कैद्याचे नाव आहे तर या घटनेत अंबादास जुलाल देवरे (40, रा.कारागृह वसाहत) यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले जळगाव कारागृहात
जिल्हा कारागृहात बंदीवान म्हणून असलेला हर्षद पटेल याच्यासह काही बंद्यांना शनिवारी बॅरेकच्या बाहेर काढण्यात आले होते. सकाळी 11 वाजता बॅरेकमध्ये परत जाण्याची वेळ झाली असता, कर्मचारी अंबादास देवरे यांनी पटेलला बॅरेकमध्ये परत जाण्यास सांगितले. मात्र, पटेलने ऐकले नाही. माझी न्यायालयाची तारीख आहे, मला तारखेवर पाठवा, अशी अट त्याने घातली.

यावर सुभेदार सुभाष खांडरे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथक उपलब्ध नसल्याने आज त्याला तारखेवर नेता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तरीही हर्षद पटेल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना, तो अचानक बेभान झाला. त्याने शिवीगाळ करत कर्मचारी देवरे यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली आणि मारहाणही केली. उपस्थित इतर कर्मचार्‍यांनी तातडीने मध्यस्थी करत देवरे यांना त्याच्या तावडीतून सोडवले.

या गंभीर प्रकरणी कर्मचारी अंबादास देवरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली हर्षद पटेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चर्‍हाटे करत आहेत.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !