अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई : तपासादरम्यान नागपूरासह जळगावातून चोरीला गेलेली वाहने जप्त
Amalner police take major action : Vehicles stolen from Nagpur and Jalgaon seized during investigation अमळनेर (9 जुलै 2025) : कार चोरीच्या तपासादरम्यान अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातून नागपूरसह जळगावातून चोरीस गेलेली महागडी वाहने जप्त केली. अमळनेर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काय घडले अमळनेरात
प्रवीण हरिश्चंद्र ठाकूर यांच्या घरासमोरून त्यांची दीड लाख रूपये किंमतीची पर्पल पांढर्या रंगाची मारुती सुझुकी डिझायर कार (क्र. एमएच 18 एजे 3110) 24 मे 2025 रोजी रात्री चोरीला गेली होती. त्यांनी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते (अमळनेर) यांच्या सूचनेनुसार, अमळनेर पोलिस नरीक्षक दत्तात्रय निकम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.





मध्यप्रदेशातून वाहने जप्त
उपनिरीक्षक नागदेव बोरकर, शिपाई विनोद संदानशीव, पोलिस शिपाई निलेश मोरे, शिपाई प्रशांत पाटील, शिपाई उज्ज्वलकुमार म्हस्के आदींचे पथक 6 जुलै रोजी मध्य प्रदेशात गेले. सोमवार, 7 जुलै रोजी त्यांना मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील सितामउ तालुक्यातील रावठी गावात संशयित आरोपी राहुल पाटीदार याच्या घरामागील गोडाऊनमध्ये चोरीचे वाहन लपवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सितामउ पोलिसांच्या मदतीने राहुल पाटीदारच्या घराची व गोडाऊनची झडती घेतली असता, तिथे दोन चोरीची वाहने आढळून आली. यात 35 लाख रूपये किंमतीची पांढर्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर (क्र. सीजी 10 बीएल 6776) आणि 12 लाखरुपये किंमतीची पांढर्या रंगाची हुंडाई क्रेटा कार (क्र. एमपी 04 झेडएल 2963) यांचा समावेश होता. या दोन्ही वाहनांचे चेसिस आणि इंजिन नंबर नष्ट करण्यात आले होते.
फॉर्च्युनर नागपूर (शहर) येथील राणाप्रताप नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आहे तर क्रेटा चोरीबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त केलेली सर्व वाहने अमळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. अमळनेर पोलिसांच्या या कारवाईबद्दल पथकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
