एस.टी.महामंडळात बोगस भरतीचा फटका : जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर कार्यमुक्त
जळगाव (11 जुलै 2025) : गतवर्षी एस.टी.महामंडळात झालेल्या बोगस भरती घोटाळ्याबाबतच्या लक्षवेधीनंतर शासनाने जळगाव एसटी विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना पदावरून कार्यमुक्त केले. याबाबतचे आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी बुधवारी काढले. धुळे विभागाचे विभाग नियंत्रक विजय गिते यांच्याकडे जळगावचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
बोगस भरतीबाबत प्रचंड तक्रारी
2024 मध्ये जळगाव एसटी विभागातील लिपिक-टंकलेखक भरती झाली व त्यात प्रचंड घोटाळा झाल्याची तक्रार व 156 सेवाज्येष्ठ कर्मचार्यांवर अन्याय झाल्याबद्दल महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे व विभागातील विभागीय कार्यशाळेचे कर्मचारी गोपाळ पाटील यांनी एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालय व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 25 फेब्रुवारी 2025 रोजी केली होती.





या प्रकरणी एस.टी. महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्यामार्फत चौकशी करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या चौकशी अहवालात नमूद विभाग नियंत्रक यांच्यावर खातेअंतर्गत कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत एकनाथ खडसे यांच्या प्रश्नावर दिले होते. भगवान जगनोर यांना जळगाव येथे चार वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झाला होता.
