राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा ?
NCP’s Jayant Patil resigns from the post of state president मुंबई (12 जुलै 2025) : राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त करणार्या जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे मात्र या वृत्ताबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोडसाळपणाचे हे वृत्त असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा शनिवारी माध्यमातून समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. अलीकडेच पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात जयंत पाटील यांनी बोलताना पवार साहेबांनी मला भरपूर संधी दिल्या, तब्बल सात वर्षे मी या पदावर काम केले. आता नव्या चेहर्यांना संधी देणं गरजेचे असल्याचे म्हटले होते. तुमच्यासमोरच मी साहेबांना विनंती करतो, अशी भावनिक सादही पाटील यांनी घातली होती. त्यानंतर, आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवारांकडे दिला असून 15 जुलै रोजी नवीन प्रदेशाध्यक्ष ठरला जाईल, नव्या नावाची घोषणा होण्याची चर्चा आहे





दरम्यान, राजीनाम्याचे वृत्त खोडसाळपणाचे आहे, असे पक्षाचे राष्ट्राय प्रवक्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ?
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही, पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावी चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहेत. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करू, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
रोहित पवारांनी राजीनाम्याच्या वृत्तावर केले शिक्कामोर्तब
रोहित पवारांनी राजीनाम्याचे वृत्त मान्य करत नवीन प्रदेशाध्यक्ष 15 जुलै रोजी जाहीर होईल, ते नाव जयंत पाटील हेच जाहीर करतील, असे म्हटली आहे.
