पाडळसेसह पिळोदा शिवारात बिबट्याने दर्शन

शेत मजुरांमध्ये भितीचे वातावरण : बंदोबस्ताची मागणी


Leopard sighted in Piloda Shivar along with Padalse यावल (14 जुलै 2025) : ग्रामीण भागात बिबट्याच्या दहशतीच्या बातम्या नेहमीच्याच झाल्या आहेत. बर्‍याच भागांमध्ये प्राण्यांसह नागरिकही बिबट्याच्या हल्ल्यात भक्ष झाल्याच्या घटनांनी परिसर भीती मध्ये आहे. अशात यावल तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने ग्रामस्थ हादरले आहेत. तालुक्यातील पाडळसे आणि पिळोदा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिले. अचानक बिबट्या दिसल्याने शेतात काम करणार्‍या मजुरांनी आणि शेतकर्‍यांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

काय घडले नेमके ?
मिळालेल्या माहितीनुसार, काही शेतकरी पाडळसे आणि पिळोदा गावांच्या हद्दीजवळ असलेल्या शेतात काम करत असताना त्यांना बिबट्या फिरताना दिसला. बिबट्याला पाहताच शेतात एकच घबराट उडाली. बिबट्याने काही वेळ परिसरात वावर केल्यानंतर तो दाट झाडीत अदृश्य झाला. याशिवाय, त्याच ठिकाणी बिबट्याने एका गाईला ठार मारल्याचेही आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत.


विशेषतः शेतीच्या कामासाठी बाहेर पडणार्‍या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा शोध घ्यावा आणि त्याला सुरक्षितपणे पकडून योग्य अधिवासात सोडावे अशी मागणी केली आहे. पाडळसे येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली असून, वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यासारख्या घटना टाळण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील काही दिवस नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि अनावश्यक रात्रीचा प्रवास टाळावा, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !