पालिका निवडणूक : चाळीसगावात एक प्रभाग वाढला

दोन सदस्यीय 18 प्रभागांमध्ये तुल्यबळ लढती : इच्छुकांची मोर्चे बांधणी


Municipal elections : One ward added to Chalisgaon चाळीसगाव (14 जुलै 2025) : पालिका निवडणुकीचे पडघम वाजले असून इच्छुकांनी एकीकडे मोर्चे बांधणीला वेग दिला असताना दुसरीकडे नोव्हेंबर-डिसेंबर अखेर निवडणुका होतील, असा राजकीय अंदाज आहे. शहराच्या नकाशावर प्रभाग स्थान निश्चितीचे काम सुरु आहे. एक प्रभागाची वाढ झाली असून दोन सदस्यीय 18 प्रभागांमध्ये तुल्यबळ लढती रंगणार आहेत. इच्छुकही सक्रिय झाले आहे. महायुती विरुध्द मविआ असा सामना रंगण्याची शक्यता अधिक आहे.
पालिकेची मुदत तीन वर्षापूर्वीच पूर्ण झाली असून, सद्यस्थितीत येथे प्रशासकराज आहे.

पालिका निवडणुकीसाठी आखाडा तापणार
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर भाजपने विजयी मोहोर कोरत पालिकेतील सत्ताही काबीज केली होती. सभागृहात शविआ मोठा पक्ष असतांनाही पाच वर्ष त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले होते. त्यामुळेच होऊ घातलेला पालिकेचा सामना चांगलाच गाजणार, हे उघड आहे.






एक प्रभाग वाढला
यापूर्वी पालिकेत 17 प्रभाग होते. तथापि नव्या रचनेत एका प्रभागातीची वाढ झाली आहे. 2011 लोकसंख्या गृहीत धरुन रचना करण्यात येत आहे. शहरात 18 प्रभाग झाले आहेत. दोन सदस्यीय प्रभाग असतील व नव्या सभागृहात 36 नगरसेवक निवडून येतील.

गत निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाच्या 9 जागा
2017 मध्ये पालिकेची निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली होती. यात 9 जागा इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने होऊ घातलेल्या निवडणुकीतही या जागा कायम राहू शकतात. यात पाच महिला तर चार पुरुष सदस्य होते. अनु. जाती प्रवर्गाचे महिला व पुरुष असे प्रत्येकी दोन तर अनु. जमातीसाठी एक जागा आरक्षित होती. खुल्या प्रवर्गाच्या एकूण 20 जागा महिला व पुरुषांमध्ये समान विभागल्या गेल्या होत्या.

तीन वर्षांपासून प्रशासकराज
चाळीसगाव पालिकेवर तीन वर्षांपासून प्रशासकराज आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी पालिकेतील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. गत तीन वर्षांपासून पालिकेचा कारभार प्रशासक पाहत आहे.

शहर विकास आघाडीला वर्चस्व भेदण्याचे आव्हान
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला शहरात मताधिक्य मिळाले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातून 76 हजारांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्याचा पराभव केल्याने पालिका निवडणुकीसाठी भाजपात इच्छुकांची चढाओढ आहे.

पालिकेच्या गत सभागृहात शहर विकास आघाडीने माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढताना सर्वाधिक 17 जागा राखल्या होत्या. त्यावेळी भाजपकडून नेतृत्वाचा झेंडा माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या खांद्यावर होता. पाटील यांनी अपक्ष आणि सेनेची मदत घेत पालिकेची सत्ता मिळवली. मात्र, गत आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

2017 च्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल
भाजप- 13

शविआ- 17

अपक्ष- 2

सेना- 2

निवडणूकपुर्व कामांना सुरूवात
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूकपुर्व कामे उरकली जात आहे. 1 सप्टेंबर रोजी अंतीम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. एक प्रभाग वाढला आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी 18 प्रभाग असतील, असे मुख्याधिकारी सौरभ जोशी म्हणाले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !