जळगावात तीन महिन्यांच्या बालकाचा मृतदेह आढळला
Body of three-month-old baby found in Jalgaon जळगाव (14 जुलै 2025) : जळगाव-आसोदा रोडवरील एका वीट भट्टीजवळअडीच ते तीन महिन्याच्या बालकाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळब्ळ उडाली आहे. मृतदेह अत्यंत विद्रुप व कुजलेल्या अवस्थेत आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
वीटभट्टी व्यावसायीक अशोक पुंडलिक कुंभार (43, रा.हनुमान नगर, रामेश्वर कॉलनी, मेहरून, जळगाव) हे आसोदा शिवारात आपला व्ययसाय करतात. हा वीटभट्टीचा व्यवसाय ते संजू हरी ढाके यांच्या शेतात चालवतात. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास कुंभार हे आपल्या वीटभट्टीवर विटा घेण्यासाठी गेले असता, त्यांना एका लहान बाळाचा मृतदेह दिसला.





हे बाळ अंदाजे अडीच ते तीन महिन्यांचे असून ते अत्यंत विद्रुप स्वरूपात दिसले. या बाळाचा चेहरा कुजलेला, डोळे बाहेर आलेले आणि डावा पाय गुडघ्यापासून तुटलेला होता. त्याच्या अंगावर एक रुमाल टाकलेला होता. ही घटना पाहताच अशोक कुंभार यांनी तत्काळ आसोदा गावातील बाळू रामकृष्ण पाटील आणि पोलीस पाटील आनंदा सीताराम बिर्हाडे यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जळगाव तालुका पोलिसात घटनेची माहिती दिली.
अधिकार्यांची घटनास्थळी धाव
माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मृत अर्भकाला जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवले. अशोक कुंभार यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपीने या लहान बाळाला जन्मानंतर गुप्तपणे या ठिकाणी टाकून दिले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
