अवैध वाहतूकदारांचे दणाणले धाबे : वरणगाव परिसरात डंपर जेसीबीसह ट्रॅक्टर जप्त


भुसावळ (15 जुलै 2025) : अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍यांवर भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने धडक कारवाई करीत जेसीबीसह दोन ट्रॅक्टर व डंपर व जेसीबी जप्त केल्याने वाळू वाहतूकदार हादरले आहेत.

यांनी केली कारवाई
वरणगाव मंडळात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. मंडळ अधिकारी रजनी तायडे यांच्या नेतृत्वाखाली तलाठी सुप्रिया बिराजदार, रेणुका पाटील, नितीन केले, रोशन कापसे, जितेश चौधरी यांनी ही कारवाई केली.


चार वाहनांवर कारवाई
तपासणीदरम्यान नागेश्वर मंदिर परिसर, चौफुलीजवळ, विल्हाळे गावाच्या दिशेने वरणगावकडे येत असताना अवैध मुरूम वाहतूक करणारी वाहने आढळली. यावेळी विष्णू भानुदास गाजरे (रा.आचेगाव) यांचे ट्रॅक्टर (एम.एच.19 ए.4246) मधून एक ब्रास मुरूम जप्त करण्यात आला.

आकाश संजय पाटील (रा.दर्यापूर) यांच्या ट्रॅक्टर (एम.एच.10 झेड. 4835) मधून अंदाजे दोन ब्रास मुरूम जप्त करण्यात आला.

घटनास्थळावरून विना क्रमांकाचे जेसीबी कुठेही कागदपत्र नसल्यामुळे चौकशी कामी जप्त करण्यात आला तसेच डंपर (एम.एच.19 सी.वाय. 0066) मधून चार ब्रास डरब जप्त करण्यात आला. हा डंपर राजेंद्रसिंग किश्नावत यांचा असल्याचे सांगण्यात आले.

वाहने तहसील कार्यालयात जप्त
जप्त वाहन चालकांकडे मुरूम वाहतुकीचे कोणतेही वैध परवाने अथवा पावत्या नसल्यामुळे सर्व वाहने व खनिज जप्त करून पंचनामा करण्यात आला व काही वाहनचालकांनी सहकार्य न केल्यामुळे पोलिस व प्रशासनाच्या मदतीने वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अशा मोहिमा नियमित राबविण्यात येतील, असे तहसीलदार नीता लबडे सांगितले. दरम्यान, जुलै महिन्यात भुसावळ महसूल प्रशासनाची अवैध गौण खनिजाबाबत दुसरी सर्वात मोठी कारवाई असल्याने अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !