चाळीसगावात नूतन निरीक्षकांचा गुटखा माफियांना दणका : सात लाखांचा गुटखा जप्त
नागदच्या व्यापार्यासह तिघांवर गुन्हा दाखल ; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

New inspectors deal blow to gutkha mafia in Chalisgaon : Gutkha worth seven lakhs seized चाळीसगाव (17 जुलै 2025) : चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याची धूरा निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात धडक मोहिम राबवली आहे. नागदच्या व्यापार्याकडील गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच निरीक्षकांच्या सूचनेनंतर पथकाने सुमारे सात लाख 19 हजार 29 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला. या कारवाईत वाहनासह 15 लाख 19 हजार 29 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनाच्या दोन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव शहरातून प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप घुले, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, योगेश बेलदार, राहुल सोनवणे, समाधान पाटील व गुन्हे शोध पथकाने बुधवारी सकाळी सातच्या सुमारास हिरापूर रेाडवर राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ वाहनांच्या तपासणी करण्याच्या हेतूने एम.एच.41 एयू. 3210 हे महिंद्रा पिकअप वाहन अडवले.

तपासणीत या वाहनात ताडपत्रीने झाकून ठेवलेला सुगंधीत पानमसाला, सुगंधीत तंबाखू असा साठा मिळून आला. पोलिसांनी वाहन चालकाकडे वाहनाबाबत कागदपत्रे मागितली असता कोणतीही कागदपत्रे आढळून आले नाही. यात सुमारे 7 लाख 19 हजार 20 रूपये किंमतीचा गुटखा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा गुटखा तसेच आठ लाख रुपये किंमतीचे वाहन असा सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. हा गुटखा दीपक प्रवीणचंद बेदमुथा (रा.नागद, ता.कन्नड, जि.छत्रपती संभाजीनगर) याचा असून त्याने सांगितल्यानुसार गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे जप्त केलेल्या वाहन चालकाने चौकशीत सांगितले.
वाहन चालक सलीम मुनीर खान (24, रा.ग्रीन पार्क, जारगाव चौफुली, पाचोरा), अरबाज इब्राहीम पठाण (22, रा.सार्वे, ता.पाचोरा) व गुटख्याचा पुरवठादार दीपक प्रविणचंद बेदमुथा उर्फ जैन (नागद, ता.कन्नड) या तिघांच्या विरोधात जळगावचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा झाला आहे.
