भुसावळातील रोडरोमिओंची आता खैर नाही ! शाळा-महाविद्यालयांभोवती फिरताना दिसल्यास दाखल होणार गुन्हा

दामिनी पथकाकडून ‘कान पकडून उठाबशा’ची शिक्षा ; युवकांमध्ये भरली धडकी


The road rage in Bhusawal is no longer a problem! भुसावळ (19 जुलै 2025) : शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात मुलींची छेड काढणार्‍या आणि दादागिरी करणार्‍या रोडरोमिओंच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी स्थापन केलेल्या दामिनी पथकाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शाळेच्या आवारातच रोडरोमिओंचे कान पकडून त्यांना उठाबशा काढायला लावण्याचे प्रकार शहराच्या विविध शाळांच्या आवारात घडत असून यामुळे रोडरोमिओंच्या गोटात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शुक्रवारी या पथकाने अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या आवारात तीन रोमिओंना त्यांचे कान धरून तेथेच उठबशा काढायला लावल्यात. दरम्यान, शाळा-महाविद्यालयाच्या आवारात विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांकडून आता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

तक्रारी वाढल्या
शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर रोडरोमिओ आणि टवाळखोरांचा वावर वाढला होता. मुलींची छेड काढणे, त्यांच्यावर कमेंट्स करणे असे प्रकार सातत्याने घडत होते, मोटर सायकल शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात घिरट्या मारणे यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. याच पार्श्वभूमीवर डीवायएसपी पिंगळे यांनी दामिनी पथकाची निर्मिती केली.


पथकाचा छपरींनी घेतला धसका
पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला पोलीस उपनिरीक्षक भारती पाटील, महिला पोलिस सीमा चिखलकर आणि पोलीस कर्मचारी हेमंत जांगडे यांचा समावेश असलेलं हे पथक आता अचानकपणे शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गस्त घालत आहे. संशयित रोडरोमिओंना जागेवरच ताब्यात घेऊन त्यांना शाळेच्या आवारातच उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जात आहे. पोलिसांची गाडी दिसताच रोडरोमिओ पसार होताना दिसत आहेत.

शुक्रवारी शहरातील अहिल्याबाई कन्या विद्यालयाच्या आवारात फिरणार्‍या काही टवाळखोरांना दामिनी पथकाने कान पकडून उठाबशा काढायला लावल्यात, त्याचबरोबर, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थीनींना उपनिरीक्षक पाटील यांनी मार्गदर्शनही केलं.

टवाळखोरांची माहिती द्या
कुठल्याही विद्यार्थीनीची छेड काढली जात असेल किंवा कोणी टवाळखोरी करत असेल, तर त्यांनी तात्काळ दामिनी पथकाला माहिती द्यावी. या कारवाईमुळे शहरात शांतता आणि सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असे बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !