पाचोरा तालुका पुन्हा हादरला : चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवले

Pachora taluka shaken again : Wife killed over suspicion of character पाचोरा (20 जुलै 2025) : पाचोरा शहरात अलीकडेच तरुणाची बसस्थानकात गोळी झाडून हत्या करण्यात आल्यानंतर आता पुन्हा पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवल्याचा प्रकार जाडगाव, ता.पाचोरा येथे घडला आहे.
प्रियंका खुशाल भदाणे (30) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पत्नीला संपवल्यानंतर पती खुशाल भदाणे याने गळफास लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी त्याला परावृत्त करण्यात आले. या घटनेने जाडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

असे आहे प्रकरण
खुशाल भदाणेला पत्नी प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयावरून रविवारी पहाटे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात खुशालने घरातील कामासाठी वापरण्यात येणार्या चाकुने प्रियंकाच्या गळ्यावर आणि पोटात सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीचा खून केल्यानंतर खुशाल भदाणे याने स्वतः गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच घटनेची माहिती मिळाल्याने पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले आणि तात्काळ ताब्यात घेतले.
या घटनेप्रकरणी मयत प्रियंका हिच्या मावशीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये पती खुशाल भदाणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय निकुंभ करीत आहेत.
