भुसावळात जबरी चोरी व मारहाण : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Forcible theft and assault in Bhusawal: Case registered against five people भुसावळ (27 जुलै 2025) : शहरातील शिव कॉलनीत गुरुवारी 24 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास एका तरुणाला जबरी चोरी करून त्याच्या मित्रास मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध जबरी चोरी, मारहाणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी राहुल रवींद्र पाटील (24, रा. आदर्श कॉलनी, खळवाडी, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, पाटील हे आपल्या मित्रासह दुचाकीने मार्केटकडे जात असताना शिव कॉलनीतील आबा चौधरी यांच्या घराजवळ संशयीत गौरव सुनिल बढे (रा. खळवाडी) याने त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये (500 च्या सहा नोटा) जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी संशयीत भरत महाजन (रा. खडका चौफळी) याने फिर्यादीच्या मित्र कल्पेश भांरबे यास मारहाण केली.
घटनेनंतर पाटील घरी परतले असता, तिथे संशयीत तेजस राजु सपकाळे (रा.हुडको कॉलनी) व संशयीत दुर्गेश सुनील बढे (रा.खळवाडी) व हर्षल राणे (रा. हुडको कॉलनी) यांनी फिर्यादी पाटील त्यांचे वडील, आई, भाऊ पंकज आणि वहिनी चैताली यांना लाथाबुक्क्यांनी, बॅटने मारहाण केली व अश्लील शिवीगाळ करत पोलिसात तक्रार केल्यास बाहेर आल्यानंतर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.
या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहेत.


