भुसावळच्या प्राथमिक शिक्षक नूतन सहकारी पतसंस्थेत 9.90 कोटींचा गैरव्यवहार : आठ माजी संचालकांसह 16 अटकेत
9.90 crores fraud in Bhusawal’s Primary Teachers’ Union Cooperative Society : 16 arrested including eight former directors भुसावळ (29 जुलै 2025) : भुसावळातील यावल रोडवरील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत 9.90 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल होताच तत्कालीन आठ संचालकांसह 16 जणांना अटक झाल्याने शिक्षण क्षेत्र व सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेने अत्यंत गोपनीय पद्धत्तीने ही कारवाई केली.
या आरोपींना अटक
अटकेतील संशयीतांमध्ये गंगाराम सीताराम फेगडे (जळगाव), हरिश्चंद्र काशीनाथ बोंडे (सावदा), राजू लालू गायकवाड (भुसावळ), हितेश संजय नेहेते (भुसावळ), रमेश चिंधू गाजरे (फैजपूर), कृष्णा गजमल सटाले (जामनेर), मधुकर श्रीकृष्ण लहासे (पहूर), सुरेश गंगाराम इंगळे (खिरोदा), कैलास पंडित तायडे (जळगाव), पंकज मोतीराम ढाके (भुसावळ), संजय तुळशीराम चौधरी (जामनेर), अझरुद्दीन राजेंद तडवी (फैजपूर), राहुल लक्ष्मीकांत चौधरी (भुसावळ), जितेंद्र सुधाकर फेगडे (भुसावळ), राजेश देविदास लहासे (फैजपूर), हितेंद्र अमोल वाघुळदे (फैजपूर) यांचा समावेश आहे.
असे आहे अपहार प्रकरण
भुसावळातील शिक्षकांच्या नुतन सह.पतपेढीत गत काळात सुमारे नऊ कोटी 90 लाखांचा अपहार झाल्याचे शासकीय लेखापालांच्या अहवालात समोर आले होते. लेखापाल प्रकाश चौधरी यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेने पावले उचलत आरोपींना बेड्या ठोकल्या.
गोपनीय पद्धत्तीने कारवाई
आर्थिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकासह भुसावळ येथे जाऊन सोमवारी दिवसभरात पतपेढीचे आठ माजी सभापती, संचालक व पतसंस्थेचे आठ कर्मचारी ज्यात व्यवस्थापक, कॅशियर, लिपिक, शिपाई अशांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक करून जळगाव शहर पोलिस ठाण्यातील कारागृहात हलवले.


