देवगाव शिवारात बिबट्याच्या हल्ला : वयोवृद्धेचा मृत्यू
Leopard attack in Devgaon Shivar : Elderly man dies जळगाव (5 ऑगस्ट 2025) : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 60 वर्षीय वयोवृद्धेचा मृत्यू ओढवला. जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारातील गट क्रमांक 55 मध्ये सोमवारी दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली. इंदुबाई वसंत पाटील (60) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून त्या शेतात काम करत असताना ही धक्कादायक घटना घडली.
इंदुबाई पाटील आपल्या शेतात काम करत असताना झाडाझुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. बिबट्याने त्यांच्या डोक्याला व चेहर्याला गंभीर दुखापत केली. त्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.
यावेळी शेजारीच काम करत असलेले बाळू पुना पाटील व रमेश पौलाद सोनवणे यांनी हा प्रकार पाहताच तात्काळ पोलीस पाटील रमेश प्रेमराज पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील रमेश पाटील आणि त्यांचे चुलत भाऊ चंद्रकांत पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पोलिसांना आणि वनविभागाला याची माहिती दिली.
इंदुबाई पाटील यांना तातडीने उपचारासाठी जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देवगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.


