36 हजारांची लाच भोवली : पारोळा-अमळनेरच्या सामाजिक वनपरिक्षेत्र अधिकार्‍यासह तिघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ

36 thousand bribe : Three including RFO in Parola caught by Jalgaon ACB भुसावळ (5 ऑगस्ट 2025) : अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड व फुलपिक लागवड योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या फाईलीला मंजुरी देण्यासाठी 36 हजारांची लाच मागून ती खाजगी पंटर व क्लार्कच्या माध्यमातून स्वीकारताना पारोळा सामाजिक वनीकरण विभागाचा आरएफओ अर्थात वनपरिक्षेत्र अधिकार्‍याला जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली.






दरम्यान, पारोळा येथील वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापूरे, (54), लिपिक निलेश मोतीलाल चांदणे (45) व कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील (27, मोरफळ, ता.पारोळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण
30 वर्षीय तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांना त्यांचे सडावण शिवारात तसेच त्यांच्या तीन नातेवाईकंना शेतामध्ये बांबू लागवड करावयाची असल्याने तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांच्या शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड व फुलपिक लागवड योजनेचा लाभ मिळण्यासाठी चार फाईल सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर यांचा अतिरिक्त कार्यभार पारोळा सामाजिक वनीकरण विभागाचे आरएफओ कापुरे यांच्याकडे असल्याने 23 जुलै रोजी पारोळत्त कार्यालयात भेट घेण्यात आली. यावेळी बांबू लागवडीच्या चार फाईली मंजुर करण्यासाठी प्रत्येक फाईलसाठी दहा हजार रुपयांप्रमाणे 40 हजारांची मागणी करण्यात आली व तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करण्यात आली.

लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी एक व दोन यांनी तक्रारदार व त्यांच्या वर नमूद नातेवाईकांच्या बांबू लागवड संदर्भात चार फाईली मंजुरीसाठी प्रत्येक फाईलचे दहा हजार रुपये मिळून 40 हजारांची मागणी केली व 35 हजार रुपये स्वतःसाठी व एक हजार रुपये आरोपी क्रमांक दोनसाठी मागितले व लाच रक्कम आरोपी कैलास भरत पाटील यांच्याकडे देण्याबाबत सांगितले. कैलास पाटील यास मंगळवारी सायंकाळी अटक केल्यानंतर अन्य दोघांनाही अटक करण्यात आली.

दरम्यान, पहिल्या आरोपीकडून पाचशे रुपयांची रोकड, रुमाल, आयकार्ड, तसेच दुसर्‍या आरोपीकडून 820 रुपयांची रोकड, एक चांदीची अंगठी तसेच तिसर्‍या आरोपीकडून 250 रुपयांची रोख रक्कम व चांदीच्या दोन अंगठ्या जप्त करण्यात आल्या. दरम्यान, आरोपींच्या घराची झडती सुरू आहे.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, चालक सुरेश पाटील, भूषण पाटील, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !