उत्तराखंडमध्ये जळगाव जिल्ह्यातील 16 भाविक अडकले : पालकमंत्र्यांचा दिल्लीत विशेष पाठपुरावा


16 devotees from Jalgaon district in Uttarakhand stuck: Guardian Minister’s special follow-up in Delhi जळगाव (7 ऑगस्ट 2025) : उतराखंडमधील अतिवृष्टी आणि ढग फुटीमुळे अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांना सुखरूप दिल्लीमार्गे जळगावला परत आणण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत विशेष बैठक घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

यांची होती उपस्थिती
या बैठकीस स्मिता शेलार, आशुतोष दिवेदी (सहाय्यक निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन) तसेच प्रमोद कोलपते (व्यवस्थापक, महाराष्ट्र सदन) हे उपस्थित होते. बैठकीत भाविकांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.



युपीतील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
यावेळी पालकमंत्री पाटील यांनी उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे खासगी सचिव हिमांशू यांच्याशी थेट संवाद साधून भाविकांना शक्य तितक्या लवकर दिल्लीपर्यंत आणण्याची विनंती केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत हिमांशू यांनी भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पूर्ण सहकार्य आणि लवकरात लवकर दिल्लीमार्गे सुटकेची व्यवस्था केली जाईल, असे आश्वस्त केले. यावेळी उतराखंडचे पोलीस उपमहानिरीक्षक निलेश भरणे यांच्याशी पालकमंत्री यांचे बोलणे झाले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे 6 ऑगस्टपासून दिल्लीमध्येच तळ ठोकून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी नियमित संपर्क ठेवून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग, रेल्वे प्रशासन व इतर यंत्रणांशी समन्वय सुरु केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता.धरणगाव) येथील 13 तरुण आणि जळगाव येथील एका कुटुंबातील 3 व्यक्ती सध्या उतराखंडमधील हर्षिलजवळील भगिरथी होमस्टे, बागोरी येथे अडकले आहेत.

हे भाविक अडकले
रोहन दिनेश माळी, रोहिल बंडू माळी, मनोज संजय चौधरी, ज्ञानेश्वर संजय माळी, दीपक रत्नाकर सोनार, सुखदेव नन्नवरे, दीपक माळी, वैभव गंगवणे, संदीप माळी, विशाल पाटील, रिवेश माळी, भूषण माळी, पवन माळी तर जळगाव शहरातील अनामिका मेहरा, त्यांची कन्या आरोही मेहरा आणि पती रुपेश मेहरा हे सर्व भाविक सुरक्षित असून या सर्व भाविकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यांच्या सुटकेसाठी उत्तराखंड प्रशासन व दिल्लीतील महाराष्ट्र सदनमार्फत तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविकांच्या जळगावमधील नातेवाईकांना धीर देताना, पालकमंत्री पाटील म्हणाले की, सरकार आपल्यासोबत आहे. सर्व यंत्रणा कार्यरत असून भाविकांना सुखरूप परत आणले जाईल.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !