शेतीच्या वादातून दाम्पत्यासह मुलाला मारहाण
Couple and child beaten up over farming dispute जळगाव (11 ऑगस्ट 2025) : शेतीच्या वाटणीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दाम्पत्यासह त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्याने बेदम
मारहाण झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे शनिवार, 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता घडली. या प्रकरणी रविवारी, 10 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.





काय आहे नेमके प्रकरण
भगवान पुंडलिक गोसावी (50, रा.नांद्रा, ता.जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह नांद्रा येथे वास्तव्यास आहेत. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता भगवान गोसावी घरी असताना, त्यांचे चुलत भाऊ मनोहर भिकनगीर गोसावी, प्रेमगीर भिकनगीर गोसावी आणि तुषार मनोहर गोसावी (सर्व रा.नांद्रा, ता.जळगाव) हे त्यांच्या घरी आले.
आमच्या शेतीची वाटणी का करत नाही? असे बोलून तिघांनी भगवान गोसावी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेसंदर्भात भगवान गोसावी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयीत मनोहर भिकनगीर गोसावी, प्रेमगीर भिकनगीर गोसावी आणि तुषार मनोहर गोसावी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण करीत आहेत.
