जळगावात किरकोळ वादातून माय-लेकाला मारहाण
Mother-in-law beaten up over minor dispute in Jalgaon जळगाव (11 ऑगस्ट 2025) : जळगावच्या हरीविठ्ठल नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ किरकोळ कारणावरून तरुणासह त्याच्या आईला मारहाण झाली. रिक्षात बसू नका, असे सांगितल्याच्या रागातून हा प्रकार घडला. 5 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी रविवार, 10 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता रामानंदनगर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण
भरत सुधाकर रंधे (21, रा.हरी विठ्ठल नगर, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. 5 ऑगस्ट रोजी रात्री भरतच्या भावाच्या रिक्षात त्याच परिसरात राहणारे चिक्या उर्फ अमोल शंकर कोकाटे, करण संजय सोनवणे, गजानन सुतार आणि समीर तडवी हे चौघेजण बसलेले होते. त्यावेळी भरत रंधे याने त्यांना या रिक्षात बसू नका असे सांगितले.





याच कारणावरून चिडलेल्या चौघांनी भरत रंधे याला आणि त्याची आईला शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणार्यांपैकी एकाने फायटरने मारहाण केल्याने भरतच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. एवढेच नाही, तर मारहाण केल्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.
या गंभीर घटनेनंतर भरत रंधे याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मारहाण करणारे चिक्या उर्फ अमोल शंकर कोकाटे, करण संजय सोनवणे, गजानन सुतार आणि समीर तडवी या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे करीत आहेत.
