भुसावळातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये बोगस मतदार ? : जिल्हा निवडणूक अधिकार्यांकडून कारवाईचे आदेश
भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : शहरातील प्रभाग क्र. 14 (आताचा नविन प्रभाग क्र. 15) मधील बोगस, मयत, स्थलांतरित व ग्रामीण मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी 2016 पासून सुरू असलेल्या तक्रारीवर अखेर जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
पटेल कॉलनी, मोहम्मद अली रोड, भुसावळ येथील इल्यास इक्बाल मेमन यांनी 15 नोव्हेंबर 2016 रोजी प्रथमच साक्षांकित पुराव्यांसह निवडणूक विभागाकडे एक हजार 250 पेक्षा जास्त बोगस व अपात्र मतदारांची यादी सादर केली होती. त्यानंतर अनेक वर्षांपासून त्यांनी तालुका व जिल्हा निवडणूक कार्यालयात वारंवार लेखी व तोंडी तक्रारी दिल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती.





याबाबत तक्रारदारांनी नुकताच 28 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी उपविभागीय अधिकारी, भुसावळ व तहसीलदार, भुसावळ यांना नियमोचित कार्यवाही करून तक्रारदारास कळविण्याचे तसेच अहवाल जिल्हा निवडणूक कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदाराच्या मते, 2022 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही त्याच बोगस व अपात्र नावांचा समावेश कायम राहिला ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 2016 पासून दिलेल्या पुराव्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघण हे लोकशाही प्रक्रियेस धक्का देणारे आहे, असे मेमन यांनी म्हटले आहे.
जिल्हा निवडणूक अधिकार्यांच्या या पत्रामुळे आता संबंधित विभागावर त्वरित व निष्पक्ष कारवाई करण्याची जबाबदारी आली आहे. यामुळे भुसावळ नगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील बोगस नावांवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
