भुसावळात वाहतूक नियमांना हरताळ फासणार्‍या 58 रिक्षा चालकांवर कारवाई


भुसावळ (19 ऑग्स्ट 2025) : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणार्‍या आणि पोलिसांच्या सूचनांकडे वारंवार दुर्लक्ष करणार्‍या एकूण 58 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर दोन रिक्षा चालकांना थांबण्याच्या सूचना दिल्यावर सुध्दा ते निघून गेल्याने दोन्ही रिक्षांचा पोलिस शोध सुरू करण्यात आला आहे.

बेशिस्त रिक्षा चालक पोलिसांच्या रडारवर
गेल्या काही दिवसांपासून शहरातील रिक्षा चालक बेशिस्तपणे रिक्षा चालवत असल्याच्या आणि वनवे असलेल्या मार्गावर पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून रिक्षा चालविल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्याने त्यांच्याकडून कारवाई केली जात आहे. या तक्रारींची दखल घेऊन वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान, वाहतुकीचे नियम मोडणार्‍या 58 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच दोन रिक्षा चालकांना थांबण्याच्या सूचना दिल्यावर सुध्दा ते पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून निघून गेल्याने अश्या दोन रिक्षांचा नंबर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले यांनी नोद करून त्या दोन रिक्षाचा शोध घेत आहे.

आगामी काळात आणखी कठोर होणार कारवाई
या कारवाईत विनापरवाना रिक्षा चालवणे, प्रवाशांना नियमापेक्षा जास्त बसवणे, गणवेश न घालणे, आणि बेशिस्तपणे रिक्षा उभी करणे अशा विविध कारणांमुळे 58 रिक्षा चालकांवर दंड ठोठावण्यात आला आहे.या कारवाईमुळे बेशिस्त रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. भविष्यातही अशा प्रकारची मोहीम सुरूच राहणार असून, सर्व रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !