भुसावळ बसस्थानक परिसरात आढळला अनोळखीचा मृतदेह
Body of an unidentified person found in Bhusawal bus stand area भुसावळ (14 ऑगस्ट 2025) : भुसावळ बसस्थानकाच्या मागील भिंतीजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जय दीपक चावरिया (37, रा.वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) हे बसस्थानकावर वाहतूक नियंत्रक आहेत. मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजता ड्युटी संपवून घरी जाताना त्यांनी एका अनोळखी इसमाला बसस्थानकातून बाहेर काढले होते.
13 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता ड्युटीवर असताना बिस्कीट विक्रेता संजय म्हैसाळ यांनी चावरिया यांना बसस्थानकाच्या मागील भिंतीजवळ एक इसम मृताअवस्थेत पडलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर चावरिया, म्हैसाळ आणि गणेश भट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, इसम हालचाल करत नसल्याने तो मृत असल्याची खात्री झाली.
मृत इसम अंदाजे वय 40 वर्षे, शरीराने मजबूत, उंची सुमारे 5.6 फूट, चेहरा लांबट, काळी वाढलेली दाढी, उजव्या हातात लाल धागा, कमरेला करदोळा, अंगात राखाडी पँट, पिवळा फुलबाही शर्ट आणि फिकट हिरव्या रंगाची निकर परिधान केलेला होता.
घटना 12 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 ते 13 ऑगस्ट सकाळी 9.30 या वेळेत घडल्याचा अंदाज आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.