भुसावळ-भादली रेल्वेचा ब्लॉकचा दुसर्‍या दिवशीही गाड्यांना फटका


भुसावळ (15 ऑगस्ट 2025) : भुसावळ-भादली स्थानकांदरम्यान इगतपुरी-भुसावळ रेल्वे मार्गावर राष्ट्रीय महामार्गावरील (नागपूर हायवे) जुन्या पुलाच्या जागी नवीन रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) रुंदीकरणाचे काम सुरु झाले आहे. या कामाअंतर्गत पाच स्टील प्लेट गार्डर्सच्या लाँचिंगला 13 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. यासाठी रेल्वेने सलग चार दिवसांचा ब्लॉक घेतला असून, त्याचा परिणाम गुरूवारी दुसर्‍या दिवशी सुध्दा ताप्ती गंगा एक्स्प्रेस व काशी एक्स्प्रेस या दोन गाड्यांना बसला.

वाहतूक व पॉवर ब्लॉकने रेल्वे गाड्या धावताय उशिराने
वाहतूक सुरळीत करण्यासाठी बीओटी तत्त्वावर सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी पहिल्या चार दिवसांमध्ये अप लाईन, डाउन लाईन, तिसरी व चौथी लाईन अशा सर्व मार्गांवर एकत्रितपणे ब्लॉक्स घेण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाने या कामासाठी दररोज सकाळी नऊ वाजल्यापासून एक तास 30 मिनिटांचा वाहतूक व पॉवर ब्लॉक मंजूर केला आहे.

लाँचिंगचे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ब्लॉकचा पहिला दिवस (बुधवार) काशी एक्स्प्रेस 2 तास, गोवा एक्स्प्रेस 2 तास 30 मिनिटे, ताप्तीगंगा एक्स्प्रेस 1 तास 30 मिनिटे तर भुसावळ-सुरत पॅसेंजर गाडी 2 तास विलंबाने सुटली होती. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला होता. गुरुवारी ब्लॉकचा दुसरा दिवसही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. काशी एक्स्प्रेस आणि ताप्तीगंगा एक्स्प्रेस प्रत्येकी एक तास उशिराने धावल्या. प्रवासी वर्गातून रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !