पावसात भिंत कोसळून ग्रामपंचायत सदस्यासह दोघे ठार
नांदेड (16 ऑगस्ट 2025) : सातत्याने सुरू असलेल्या पावसाने भिंत कोसळून ग्रामपंचायत सदस्यासह दोघांचा मृत्यू ओढवला. ही घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात घडली. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
काय आहे नेमकी घटनाा
कंधार तालुक्यातील कोटबाजार गावात घराची भिंत कोसळताच दोघांचा मृत्यू झाला. कंधार तालुक्यात ही घटना घडली. कोटबाजारचे माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासेर व त्यांचा पत्नी ग्रामपंचायत सदस्यांच्या अंगावर भिंत कोसळली.





कंधारमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या घटनेमुळे कोटबाजार परिसरात शोककळा पसरली. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे देखील ढगफुटी सारखा पाऊस झाला. याशिवाय पैनगंगा नदीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे. माहूर येथील धानोडा पुलावरुन पैनगंगेचे पाणी वाहत आहे. त्यामुळे, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पाण्यात वाहिली ठार कार
नांदेड जिल्हयात सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू शहरातील हिमायतनगर तालुक्यात हदगाव-हिमायतनगर रस्त्यातील अंडरब्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या पाण्यातून एकाने थार कार नेण्याचा प्रयत्न केला पण येथील ब्रीजमध्ये पाणी जास्त असल्याने कार मध्येच बंद पडली आणि पाण्यात अडकली. पाण्यात अडकल्यानंतर ही थार पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत असल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव जवळची ही घटना आहे.
बस अडकली पाण्यात, चालक बेपत्ता
जिल्ह्यातील किनवट तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला असून नदी नाल्यांना पूर आला आहे. बोधडी ते सिंदगी रस्त्यावर शाळेची रिकामी बस पुराच्या पाण्यात अडकली. पाण्याचा जोर वाढल्याने काही अंतरापर्यंत ही स्कूल बस वाहून गेली, नंतर एका ठिकाणी बस अडकून पडली. सुदैवाने बसमध्ये चालकाशिवाय कोणी नव्हते. मात्र, बसमधील चालक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.
