वंचित आघाडीच्या लढ्याला यश : भुसावळ पालिका घरकुलात अतिक्रमणधारक नियमित होणार !
रेल्वे अतिक्रमण धारकांच्या पुर्नवसनाची प्रक्रिया 45 दिवसात पूर्ण करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
Success for the struggle of the deprived front: Encroachments in Bhusawal Municipality housing units will be regularized! भुसावळ (18 ऑगस्ट 2025) : भुसावळातील रेल्वे अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सहा दिवस बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आंदोलनाची दखल घेत सोमवार, 18 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावल्यानंतर 45 दिवसांच्या आत अतिक्रमण धारकांच्या पुर्नवसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे तसेच पालिकेच्या घरकुलात वास्तव्यास असलेल्या अतिक्रमण धारकांना नियमित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
यांची होती बैठकीला उपस्थिती
मंत्री आमदार संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रशेखर तायडे आदींची उपस्थिती होती.





45 दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश
बैठकीत मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया तीन टप्प्यात मात्र 45 दिवसांच्या आत पूर्ण करण्याची सूचना केली. सध्या भुसावळ नगरपालिकेच्या घरकुलांमध्ये वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना त्याच ठिकाणी नियमित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेत यावेळी घेण्यात आला तसेच रेल्वे अतिक्रमणधारकांना सर्वे नंबर 63/1 या भूखंडावर असलेले पार्कचे आरक्षण हटवून प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. लवकरच शासन स्तरावर या सर्व प्रक्रिया पूर्ण करून योग्य लाभार्थींची पडताळणी करण्याची प्रक्रियादेखील युद्ध पातळीवर सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे लवकरच सर्व अतिक्रमणधारकांना हक्काचा निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यांची होती उपस्थिती
बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, भीम आर्मीचे गणेश सपकाळे, रमेश मकासरे, संदेश सुरवाडे, संगीत खरे, विशाल सोयंके, मथुराबाई पवार, प्रदीप भालेराव, किरण जमदाडे, श्रीकांत वानखेडे,ि वनोद तिमोती यांच्यासह अतिक्रमणधारक उपस्थित होते.
घरे मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार : बाळा पवार
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनामुळे रेल्वे अतिक्रमणधारकांचा सात वर्षांचा वनवास संपून त्यांना लवकरच आपला हक्काचा निवारा मिळणार असल्याचा मनापासून आनंद होत आहे. आम्ही शेवटपर्यंत पुनर्वसन प्रक्रियेचा पाठपुरावा करू. वंचितच्या लढ्यात सोबत असलेल्या सर्वांचे आभारी असल्याचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा (विजय) पवार म्हणाले.
