भुसावळ शहर ही तर कलावंतांची खाणच : मंत्री संजय सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे नाटीका : स्वातंत्र्य सेनानी नेताजींच्या जीवनाचे विविध पैलू उलगडले : ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ घोषवाक्य गुंजले
भुसावळ (18 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहर ही कलावंतांची खाण आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील नाटीकेत स्थानिक कलावंतांनी कौटूंबिक जवाबदार्या सांभाळून वेळ देत निभावलेल्या भूमिका कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शहरात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी काढले. शहरातील संतोषी माता सभागृहात रविवार, 17 रोजी सादर झालेल्या नाटीकेप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भुसावळ डीवायएसपी संदीप गावीत, उद्योजक मनोज बियाणी, कृउबा सभााती अनिल वारके, डॉ.संगीता बियाणी, डॉ.रश्मी शर्मा, माजी सभापती ज्ञानदेव झोपे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राध्येश्याम लाहोटी, भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक आदींची उपस्थिती होती.





अशा कार्यक्रमांची समाजाला गरज : पोलिस उपअधीक्षक
नूतन पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. अशा कार्यक्रमांची समाजाला आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगून यापूर्वी महिला मंडळाच्या कार्यक्रमांविषयी जे ऐकले होते त्याचा प्रत्यक्षात अनुभवही घेतल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येकवेळी सुधारणा : डॉ.रश्मी शर्मा
डॉ.रश्मी शर्मा म्हणाल्या की, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलावंत लाखमोलाचा असून ज्यांना संधी देण्यात आली त्या प्रत्येकाने संधीचे सोने केले व तांत्रिकदृष्ट्या प्रत्येकवेळी सुधारणा होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

नेताजींच्या जीवनाचे विविध पैलू नाटीकेतून उलगडले
प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारीत नाटीकेत त्यांचा जन्म, शिक्षण आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा प्रवेश, स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला लढा, जीवनातील महत्त्वाचे प्रसंग व विचारांचा नाटीकेतून उलगडा करण्यात आला. विशेषतः विविध व्यावसायीक तसेच खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करणार्या सुमारे 30 वर कलावंतांनी नाटकात नेताजींच्या जीवनाचे विविध पैलू सादर केले. यामध्ये त्यांचे विद्यार्थी जीवन, आझाद हिंद सेनेची स्थापना आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या रणनीतींचा समावेश होता. कलाकारांनी त्यांच्या प्रभावी संवाद आणि अभिनयाने प्रेक्षकांना स्वातंत्र्यलढ्याच्या ‘त्या’ काळात नेले.
कार्यक्रमातील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे जेव्हा नेताजींचे प्रसिद्ध घोषवाक्य ’तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ हे घोषवाक्य व्यासपीठावरून प्रेक्षकांपर्यंत गुंजले. देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने वातावरण आणखी रोमांचक बनवले. नाटकात उपस्थित प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना स्पष्टपणे दिसून आली. नाटकाच्या समारोपात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. या नाटीकेत सुभाषचंद्र बोस यांची भूमिका हिरो वासवानी यांनी तर सहकलावंत भूषण बजाज व हरेश लुल्ला यांनी वठवली तर निवेदक म्हणू मिथलेश बजाज यांनी काम पाहिले.
देशभक्तीपर गीतांना उत्स्फूर्त दाद
कार्यक्रमाच्या सुरूवातीला गणेश वंदना म्हणण्यात आली व नंतर देशभक्तीपर आधारीत गीतांचे सादरीकरण करण्यात आले. विशेषतः 83 वर्षीय प्रमिला बर्हाटे यांनी ज्येष्ठांसह देशभक्तीपर नृत्यात सहभाग नोंदवून उपस्थितांचा उत्साह वाढवला. प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करण्यात आले.
अन् पंतप्रधान मोदी अवतरले
जम्मू-काश्मीरमध्ये देश-विदेशातील पर्यटकांची जी नृशंस हत्या करण्यात आली व त्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंधूरची रणनीती यावेळी डमी कलावंतांद्वारे सादर करण्यात आली. विशेष आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वासारखे उभेऊभ दिसणारे गोपाळजी पांडे (भुसावळ) यांना समोर आणताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कार्यक्रमानंतर अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फिही काढली. ‘सिंधूर’ प्रमाणेच येथेही महिलांना संधी देत महिला सक्षमीकरणाचा संदेशही देण्यात आला.
मंत्री संजय सावकारे यांच्या गीताने आणली रंगत
नेताजी बोस यांच्या जीवनावरील कविता मंत्री संजय सावकारे यांच्या आवाजातून डबिंग करण्यात आल्याने तिलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात मंत्री संजय सावकारे यांनी ‘ये देश हे वीर जवानों का’ गीत सादर केल्याने उपस्थितांनीही यावेळी ठेका धरला.
महिलांना सक्षम करणे हाच उद्देश : रजनी सावकारे
प्रास्ताविकात प्रतिष्ठा महिला मंडळाच्या रजनी संजय सावकारे म्हणाल्या की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या उद्देशाने महिला मंडळातर्फे उपक्रम राबवण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापुरूष पुरूष, महान स्त्रियांचे कार्य समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. थोर पुरूषांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य मिळाले असून आजची पिढी इतिहास विसरता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी करून आभारही मानले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
