रानभाज्यांमधील विविध प्रकारची जीवनसत्वे शरिरला ठरतात पौष्टिक : भुसावळातील महोत्सवात मान्यवरांचा सूर
Various types of vitamins in wild vegetables are nutritious for the body : Dignitaries speak at the festival in Bhusawal भुसावळ (19 ऑगस्ट 2025) : रानभाज्यांमधील विविध प्रकारचे जीवनसत्वे ही शरीरला पौष्टिक व पोषक गुणधर्म देत असतात, यामुळे रानभाजी महोत्सव हा सर्वांसाठी लाभदायक असून रानभाजी ही शरीरासाठी आवश्यक असल्याचा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. शहरातील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व तालुका कृषी विभागातर्फे रविवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. म्युनिसिपल हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते झाले.
नागरिकांनी केली रानाभाज्यांची खरेदी
यावेळी भाज्यांचे महत्व जाणुन घेत बहूसंख्य नागरिकांनी रानभाजीची खरेदी केली. या महोत्सवाच्या उपक्रमाला इनरव्हील रेल सिटी व पालिका प्रशासनाचे सहकार्य लाभले. महाराष्ट्र शासन कृषि विभाग, रोटरी क्लब ऑफ रेलसिटी व इनरव्हील क्लब, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 17 रोजी म्युनिसिपल हायस्कूल, येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.





यांची होती उपस्थिती
महोत्सवास तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे, मंडळाधिकारी ऋषीकेश चौधरी व रोटरी क्लबचे अध्यक्ष देवेंद्र वाणी, ईनरव्हील क्लबच्या सीमा सोनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रानभाज्याचे मानवी आहारदृष्टया महत्व विषद करतांना तालुका तंत्र व्यवस्थापक आत्मा कृषी विभागाचे प्रमोद जाधव यांनी रानभाज्यामध्ये असलेले विविध प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे यांविषयी माहिती दिली. त्याचे आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक, आरोग्यदायी व पौष्टिक गुणधर्म याविषयी मार्गदर्शन करून या रानभाज्या नियमीत सेवनाने बरेच असाध्य आजारावर गुणकारी आहेत, असे सांगितले. तसेच नागरिकांनी रानभाज्या खा… व निरोगी जीवन जगा…. असे रानभाज्याविषयी आवाहन केले.
यांना मिळाली भेटवस्तू
रानभाजी महोत्सवात जळगाव, भुसावळ, यावल, जामनेर व मुक्ताईनगर येथील शेतकरी गटांनी रानभाज्याचे व पाककला कृतीसह खाद्य पदार्थाचे स्टॉल लावले होते.
उत्कृष्ट पाककला कृतीसाठी श्री गणेश महिला शेतकरी गट विल्हाळे यांना रानभाज्यापासून तयार केलेले फाग पानांचे फुणके,अंबाडी पानांची कढी,शेवगा पानांचे धपाटे व मुगाच्या हेडन्या यासाठी देण्यात आले, द्वितीय पारितोषिक व्यंकटेश मशरुम फार्मचे केतन चौधरी यांचे मशरुम वडापाव व सुप यासाठी तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शशिकला भंगाळे (भुसावळ) यांना अळू पानाचे व कोथिंबीर वड्या यासाठी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
36 शेतकरी, 5 पाककला स्टॉल
महोत्सवात भुसावळ पंच क्रोशीतील एकूण 36 शेतकरी व महिला गटांनी रानभाज्याचे स्टॉल व 5 पाककला कृतीसह खाद्य पदार्थाचे स्टॉलसाठी सहभाग नोंदवला. या सर्वांना सहभागी झाल्याचे त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इनरव्हील क्लब भुसावळ यांचे तर्फे टाकाऊ कपड्यांपासून टिकाऊ इको फ्रेंडली पिशव्या तयार करून त्यांचे रानभाज्या खरेदीदार नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले.
700 नागरिकांनी दिली भेट
रानभाजा महोत्सवाला यावेळी भुसावळ शहरातील व परिसरातील 700 नागरिकांनी भेट देऊन मंडपात लावलेल्या विविध रानभाज्याचे रेसीपीचे मोबाईल मध्ये फोटो काढून रानभाज्याची व त्यापासून तयार केलेल्या प्रक्रिया पदार्थाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील समस्त अधिकारी,कर्मचारी आणि रोटरी क्लब ऑफ रेलसिटी भुसावळ व इनरव्हील क्लब भुसावळ यांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
