टेंडरची अनामत परत देण्यासाठी पाच हजारांची लाच भोवली : जळगाव महापालिकेच्या कंत्राटी कर्मचार्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
ACB arrests Jalgaon Municipal Corporation contract employee and clerk for accepting bribe of Rs. 5,000 to return tender deposit भुसावळ (19 ऑगस्ट 2025) : टेंडरची अनामत परत देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव महापालिकेतील लिपिकासह कंत्राटी कर्मचार्याला जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोर पुरते हादरले असून एसीबीच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आनंद जनार्दन चांदेकर (37, देविदास कॉलनी, पंचमुखी हनुमान नगरामागे, जळगाव) व शहर समन्वयक राजेश रमण पाटील (35, रा.प्लॉट नं.8, भूषण कॉलनी, गिरणा टाकीजवळ, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.





असे आहे लाच प्रकरण
48 वर्षीय तक्रारदार यांची कर सल्लागार संस्था आहे. ते एका संस्थेला नवीन बसस्थानक, जळगाव येथील नव्याने बांधलेले आधुनिक वातानुकूलित सार्वजनिक शौचालय पे अॅण्ड युज तत्वावर चालविण्यासाठी टेंडर भरणे व त्या संबधीत काम तक्रारदार करीत होते. 4 एप्रिल 25 रोजी संस्थेतर्फे नवीन बसस्थानकातील नव्याने बांधलेले वातानुकूलित सार्वजनिक शौचालय पे अॅण्ड युज तत्वावर चालविण्यास मिळण्याासाठी महापालिकेत टेंडर दाखल करण्यात आले व त्यापोटी 35 हजारांची अनामत डीडीद्वारे भरण्यात आली मात्र काही कारणास्तव टेंडर मिळू शकले नाही.
भरलेली अनामत परत मिळण्यासाठी 29 जुलै 2025 रोजी महानगरपालिकेत लिपिक आनंद चांदेकर यांची भेट घेतली असता ही रक्कम परत मिळवून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागण्यात आली होती. या संदर्भात मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. चांदेकर यांनी लाच मागून ती रक्कम पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले व पाटील यांनी लाच रक्कम टेबलावर ठेवण्यास सांगून स्वतः रक्कम स्वीकारतच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, ग्रेडेड पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल भूषण पाटील आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
