गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या 367 जादा फेर्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार
367 additional train trips for Ganesh devotees this year मुंबई (19 ऑगस्ट 2025) : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो. यासाठी यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा 367 जादा फेर्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच, राज्यातील तमाम गणेशभक्तांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.





आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने महाऱाष्ट्र शासनाने केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेशभक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्री कोकणात तसेच अन्यत्र जाणार्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी दरवर्षी पेक्षा जादाच्या 367 फेर्यांचे नियोजन केले जाईल, असे पत्रोत्तर दिले आहे, असे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईत राहणारे कोकणवासी गणेशभक्त गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुळगावी कोकणात जातात. तसेच राज्याच्या अन्यभागातील नागरिक देखील या सणासाठी प्रवास करतात. या सगळ्यांची या जादाच्या फेर्यांमुळे सोय होणार आहे.
राज्यातील गणेशभक्तांसाठी हा मोठा दिलासा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
