पारोळा तालुक्यात एस.टी.बस-टेम्पोचा अपघात : एक प्रवासी ठार, पाच गंभीर


ST bus-tempo accident in Parola taluka : One passenger killed, five seriously injured पारोळा (20 ऑगस्ट 2025) : सोयगावहून धुळ्याकडे जाणार्‍या एस.टी.बस व खाजगी टेम्पोत वळणावर झालेल्या धडकेत एक प्रवासी ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले. भडगाव-पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.

असा घडला अपघात
बुधवार, 20 ऑगस्ट रोजी सोयगाव आगाराची बस (एम.एच.14 बी.टी.1984) सोयगावहून धुळ्याकडे जात असताना वाघरे गावाजवळील वळणावर समोरून येणार्‍या खासगी टेम्पो (एम.एच.19-सी.वाय.1606) वर धडकली. या धडकेनंतर बसमधील आणि टेम्पोमधील अनेक प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी मदतीसाठी स्थानिक नागरिक तसेच प्रशासन पोहोचले.






अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे चालविण्यात येणारी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा तत्काळ सक्रिय झाली. रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शेलार यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अन्य खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

खाजगी वाहनातील प्रवाशाचा मृत्यू
या भीषण अपघातात पंकज पाटील (30, उंदीरखेडा) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मिराबाई पंढरी सोनवणे (55, सोयगाव), निलाबाई घनश्याम सिरसागर (75, धुळे), अंजनाबाई रघुनाथ पाटील (70, हनुमंत खेडा), मनोहर सजन पाटील (60, चोरवड), रमेश धोंडू चौधरी (80, भडगाव), मीराबाई रघुनाथ पाटील (80, धुळे) आणि जानवी संतोष मोरे (19, धुळे) यांचा समावेश आहे. या जखमींवर पारोळा आणि भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर मराठे आणि यश ठाकूर यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.

दरम्यान, आगार व्यवस्थापक प्रमोद बी.चौधरी, अमळनेर आगाराचे वाहतूक निरीक्षक अनिकेत नायदे, जळगावचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप गुलाब बंजारा आदींनी धाव घेत जखमींची विचारपूस केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !