वरणगावातील मुख्य रस्त्याचा डांबरीकरणाचा तिढा सुटला


भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील बसस्थानक ते रेल्वेस्थानक पर्यंतच्या रस्त्याचे काम 18 मीटर 24 मीटर या वादामुळे रखडले होते तर रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब टाकण्यासाठी कर्मचारी आल्यानंतर हे काम बंद करण्याची मागणी पूर्वेकडील महिलांनी केल्याने काम बंद करण्यात आले व विजेचे खांब न टाकता रस्त्याचे काम करून घेण्याचे सर्वानुमते ठरले.

तूर्त खांब टाकणे टाळले
बसस्थानक ते रेल्वेस्थानकाच्या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून निधी मंजूर केला होता परंतु 18 मीटर व 24 मीटर वाद निर्माण झाल्याने भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांनी रस्त्यांची मोजणी करून महात्मा गांधी विद्यालय पर्यंत 18 मीटर व पुढे 24 मीटर असल्याचे खुणा दिल्या मात्र या मोजणी बाबत पूर्वेकडील नागरीकांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब टाकण्यासाठी कर्मचारी आले असता पूर्वेकडील महिलांनी विरोध केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, नगराध्यक्ष सुनील काळे, तळवेलचे माजी सरपंच ज्ञानदेव झोपे, पंकज पाटील व व पूर्वेकडील काही व्यावसायीकात सामंजस्य चर्चा होऊन विजेचे खांब टाकण्याचे काम तात्पुरता थांबवून सध्या अठरा मीटरचा रस्ता तयार करून घेण्यावर एकमत झाले. यामुळे येथील रस्त्याचा प्रश्न आता निकाली निघणार आहे मात्र रस्त्याच्या मध्यभागी येणारे विजेचे खांब कोणत्या बाजूने टाकले जातील याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाहतुकीची कोंडी सुटेल
बसस्थानक रेल्वेस्थानक पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खडी टाकून त्यावर ती माती टाकत दबाई करण्यात आली परंतु पावसामुळे या ठिकाणी चिखल निर्माण होऊन रस्त्यावरून चालणे कठीण होते तसेच रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अठरा मीटरचा रस्ता झाल्यानंतर मात्र वाहतूक कोंडी सुटण्याची आशा आहे.


कॉपी करू नका.