तुम्ही खात असलेली मिठाई निकृष्ट तर नाही ना ! ; जळगावात 24 हजारांचा साठा नष्ट

भुसावळात शहरातील हॉटेलसह डेअरींमध्ये तपासणी करण्याची सर्वसामान्यांची मागणी


जळगाव (21 ऑगस्ट 2025) : अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील मिठाई उत्पादकावर कारवाई केल्यानंतर अनेक उत्पादकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. मिठाई ही प्रत्येकाच्या आवडीचा विषय असलीतरी तिचा दर्जा तपासणेही गरजेचे असल्याने जळगाव जिल्ह्यात आता मोहिम उघडण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शिरसोली प्र.न. येथील एका मिठाई उत्पादकावर मोठी कारवाई करीत 24 हजारांचा साठा जागीच नष्ट करण्यात आला. दरम्यान, जळगाव शहरात कारवाई होत असलीतरी भुसावळातही हॉटेल्ससह डेअरींची तपासणी करून नमूने घ्यावेत, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

छापेमारीने जळगावात खळबळ
मिठाई तयार करण्यात येणार्‍या घटकांच्या गुणवत्तेवर व विक्रीसाठी ठेवलेल्या साठ्यावर संशय आल्याने अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी मे. चौधरी स्वीट्स अँड नमकीन या प्रतिष्ठानवर मंगळवार, 19 ऑगस्ट 2025 रोजी अचानक धाड टाकली. तपासणीदरम्यान पेढा, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, गोड गावा आदी मिठाई कमी प्रतीची असल्याचे आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार उत्पादन योग्य न मिळाल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणाहून नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.






यावेळी मिळालेल्या मिठाईच्या एकूण 151 किलोग्रॅम साठ्याची किंमत 24 हजार 130 रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले असून, सदर साठा नाशवंत स्वरूपाचा असल्यामुळे तो तात्काळ नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ.साळुंके, प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी आकाश बोहाडे, योगराज सुर्यवंशी, आकांक्षा खालकर व पद्मजा कढरे यांनी संयुक्तरित्या केली. संपूर्ण तपासणी व कारवाई ही सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन अधिकारी संतोष कृ.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात होणार कारवाई
संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारे अस्वच्छ व दर्जाहीन अन्नपदार्थ विक्री करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त कांबळे यांनी अधिकृत प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. नागरिकांनीही अशा विक्रेत्यांविषयी सतर्क राहून माहिती प्रशासनास देण्याचे आवाहन त्यांनी केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !