जळगावातील व्यापार्‍यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट : व्यवसाय परवाना कर रद्द करूनच राहणार !


Jalgaon traders meet Guardian Minister : Business license tax will remain abolished! जळगाव (22 ऑगस्ट 2025) : जळगाव महानगरपालिकेने लागू केलेल्या व्यवसाय परवाना कराच्या निर्णयाला शहरातील व्यापार्‍यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. मनपाचा हा निर्णय रद्द करण्यासाठी आज जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ आणि व्यापार्‍यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. ना.पाटील याबाबत अधिक माहिती घेत सोमवारी मनपा आयुक्तांना बोलावून चर्चा करणार असल्याचे सांगितले.

मनपाने प्रत्येक व्यवसायधारकाकडून वर्षाकाठी 200 ते 25,000 रुपये परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 4-5 मनपा वगळता कुठेही हा कर लागू नाही. ड वर्ग महापालिका असलेल्या जळगावात व्यापार्‍यांना सोय सुविधा न देता घेतलेला हा अवाजवी निर्णय चुकीचा आणि अन्यायकारक असल्याचे व्यापारी महामंडळाने म्हटले आहे. तसेच हा निर्णय लागू न करण्यासाठी यापूर्वी शासन दरबारी आणि लोकप्रतिनिधींकडे देखील पाठपुरावा करण्यात आला होता.




पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा
व्यवसाय परवाना कर निर्णय रद्द करण्याचा लढा तीव्र करण्यासाठी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ पदाधिकार्‍यांनी दोन दिवसापूर्वी बैठक घेतली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे आज महामंडळ पदाधिकारी आणि व्यापारी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यापूर्वी पालकमंत्री यांना याबाबत अवगत केले असल्याने त्यांनी महाराष्ट्रातील इतर मनपाची माहिती घेतली होती. त्यात जळगावात लावण्यात आलेला करबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

व्यापार्‍यांनी मांडले मुद्दे
महाराष्ट्रातील मेट्रो शहरांमध्ये परवाना शुल्क आकारले जाते, परंतु तिथे मनपा सुविधा पुरवते. जळगावात मात्र स्वच्छता, शिक्षण, वृक्ष कर यांसारखे अनेक कर आकारले जातात, परंतु कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. शासनाने काही वर्षांपूर्वी शॉप अ‍ॅक्ट बंद केला. नोंदणी प्रक्रिया सुलभ केली. प्रमुख कर हटवून जीएसटी लागू केला. ऑनलाईन बाजारपेठमुळे स्थानिक व्यापारी अगोदर अडचणीत आहे. बाजारातील मंदी, जागतिक मंदीचे सावट यामुळे देखील व्यापार्‍यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे व्यापार्‍यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगितले.

आयुक्तांना सोमवारी चर्चेसाठी बोलावले
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यापार्‍यांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या असून याबाबत अधिक आणि सविस्तर चर्चा करण्यासाठी मनपा आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली. तसेच त्यांना सोमवारी पुन्हा भेटीसाठी बोलावले आहे. मनपाने लागू केलेला हा व्यवसाय परवाना कर रद्द न केल्यास व्यापारी आपला लढा अधिक तीव्र करणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

चर्चेसाठी यांची होती उपस्थिती
निवेदन देताना जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, उपाध्यक्ष युसूफ मकरा, उपाध्यक्ष प्रवीण पगारिया, संचालक रामजी सूर्यवंशी, सुभाष कासट, कैलास कासार, व्यापारी अनिल कांकरिया, मुर्तुझा शाकीर, धर्मेंद्र जैन, अनिल अग्रवाल, श्रीचंद अडवाणी, शांतीलाल नावरकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !